Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधनिर्मिती जिवंत रोबोंची!

निर्मिती जिवंत रोबोंची!

अमेरिकेतल्या संशोधकांनी एक विलक्षण क्रांतिकारी शोध लावला आहे. अर्धा बेडूक आणि सुपर कॉम्प्युटरने बनवलेल्या अर्ध्या जीवाच्या माध्यमातून त्यांनी एका नव्या जीवाला जन्म घातला. एक जिवंत रोबो निर्माण केला! या आधीचे सगळे रोबो कृत्रिम होते. त्यानंतर आलेली ‘डॉली’ मेंढी ही क्लोन पद्धतीने आली होती. परंतु आता जे घडतेय ती आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधली सर्वात मोठी क्रांती म्हणायला हवी.

विशेष

– उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

- Advertisement -

पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले याबद्दलचे कुतूहल मनुष्यजातीच्या अस्तित्वापासून आहे आणि एकविसाव्या शतकात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांनी भरघोस प्रगती केली तरीदेखील ते गूढ अजून पूर्णपणे उकललेले नाही. त्यामुळे जीवन कसे बनते हा अनादि काळापासूनचा शोध सातत्याने सुरू आहे. ही एक अनाहत यात्रा आहे. आज हे सर्व लिहायचे कारण म्हणजे अमेरिकेतल्या हार्वर्ड, व्हर्माऊंट आणि टफ विश्वविद्यालयातल्या संशोधकांनी एक विलक्षण क्रांतिकारी शोध लावला आहे आणि तो म्हणजे अर्धा बेडूक आणि सुपर कॉम्प्युटरने बनवलेला अर्धा जीव यांच्या माध्यमातून एका नव्या जीवाला जन्म घातला. एक जिवंत रोबो निर्माण केला!

गेली 60 वर्षे त्यावर संशोधन सुरू होते. प्रथम हे सर्व स्वप्नवत वाटत होते. मग त्याचे विचारात रूपांतर झाले. तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शेकडो शास्त्रज्ञांनी हजारो प्रयोग केले आणि एक अत्यंत पथदर्शी असे संशोधन मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले आणि ते म्हणजे स्वनिर्मिती करू शकणारे रोबो. म्हणजे यापुढे रोबोज मुले जन्माला घालू शकतील. या रोबोंना आतापर्यंत मशीनसारखा चेहरा होता. पण आता त्याला मानवी चेहरा देता येणार आहे. ही एखादी कल्पनारम्य सायन्सची वेबसीरिज नाही अथवा हॉलिवूडचा गूढ विज्ञानपटही नाही. तर आता सुपर कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपल्यासारखा चेहरा-मोहरा असलेले लाखो जिवंत रोबो तयार करणे शक्य होणार आहे.

ठराविक जीवजंतूपासून या आविष्काराची सुरुवात झाली आहे. त्याला झेनोबोट असे नाव आहे. एका जीवशास्त्रीय पेशीपासून अत्याधुनिक प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करण्यात आली आणि या संशोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. अगदी माणसासारखे दिसणारे रोबो… दोन लाख डॉलर्स देऊन बिलकूल तुमच्यासारखा, तुमच्या आकाराचा, हाडामांसाचा, हुबेहुब तुमचा आवाज असणारा जिवंत रोबो तयार करता येणार आहे! संपूर्ण विज्ञान विश्वात या माहितीने मोठा थरार निर्माण झालाय. कारण आतापर्यंत कारखान्यांमध्ये काम करणार्‍या मनुष्यापासून भिन्न असणारे मशीन रोबो आपण पाहिले होते. सोफियासारखे मनुष्यसदृश मशीन रोबो ओळखीचे झाले होते. पण आता जे होतेय ते जिवंत रोबोचे युग. महासंगणकाद्वारे जन्माला घातलेला या पृथ्वीवरचा पहिला जीव. स्वतःसारखीच निर्मिती स्वतःपासून करू शकणारा प्रयोगशाळेत बनलेला पहिला जीव. ज्ञानाची ही एक नवी शाखा निर्माण झाली आहे आणि त्या ज्ञानशाखेत जिवंत रोबोचे संशोधन आता निर्णायक टप्प्यावर आले आहे.

हे कसे शक्य झाले, तर गर्भापासून स्टेमसेल वेगळे करून त्याची पूर्वनियोजित मांडणी, ही प्रक्रिया अत्यंत किचकट, जटील आहे. शरीराचे विविध भाग जसे की त्वचा, हृदय त्यातून निर्माण करून महासंगणकाद्वारे प्रोग्राम केले गेले. यासाठी लागणार्‍या मूळ पेशी एका आफ्रिकन बेडकापासून घेण्यात आली. त्याचे कारण या प्रजातीच्या बेडकामध्ये पुनर्निर्मितीची क्षमता अफलातून आहे आणि ही पुनर्निर्मिती करताना तो बेडूक फक्त स्वतःच्या शरीराचाच वापर करतो. तुम्ही गर्भापासून स्टेमसेल विलग करता तेव्हा ती सेल वातावरणाशी जुळवून घेते आणि मग आपल्यासारखा जीव पुनरुत्पादित करते. शास्त्रज्ञांना हेच हवे होते आणि म्हणून त्या बेडकाचा वापर केला गेला. या झेनोबोटचा आकार ‘सी’ या इंग्रजी अद्याक्षरासारखा आहे. गंमत म्हणजे महासंगणकाने हेच अद्याक्षर का निवडले तर 1980 च्या दशकातल्या ‘पॅक मॅन’ या व्हिडिओ गेममध्ये हा आकार खूप लोकप्रिय झाला होता. सॅम क्रेगमन, डगलस ब्लॅकिस्टन, मायकेल लेव्हीन आणि जोश बॉन्गार्ड या चार दिग्गज शास्त्रज्ञांनी झेनोबोट 3.0 ची निर्मिती केली. मॉलिक्युलर बायोलॉजी आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्स याचा हा अप्रतिम आविष्कार. सेल एखादी गोष्ट हुबेहुब कॉपी करतात. त्याच्या आशयासकट आणि विघटित होऊन एक नवी रचना निर्माण करतात आणि हे सगळे एका महासंगणकाआधारे पूर्वनियोजित सूचनेनुसार नियंत्रित केले जाते. या प्रक्रियेला कायनॅमॅटिक सेल्फ रिप्लिकेशन असे नाव आहे. या संशोधनामुळे सध्या ही ज्ञान शाखा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

मग हे जिवंत रोबोचे संशोधन वरदान की शाप? याचा हेतू काय? त्याने काय साध्य होणार? काही निर्माण होणार की त्यातून संहार होणार? मानवी जीवनासमोरचे पर्यावरण, असाध्य रोग यापासून या संशोधनामुळे मुक्ती मिळू शकेल का? आज हे संशोधन अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अखत्यारित आहे. त्याचा उपयोग विधायक कामांसाठीच होईल याची काय हमी? उद्या हे मानव विघातक शक्तींच्या हाती पडले तर.. आज हा जिवंत रोबो प्रोग्राम्ड आहे. पण उद्या तो स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ लागला अन् हजारोऐवजी करोडोची पुनरुत्पादिता दाखवू लागला तर भीषण प्रश्न निर्माण होतील. आताच या सगळ्याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. एकीकडे अशा प्रकारचा जिवंत रोबो तुमच्या एकटेपणावर एक उत्तम उपाय असू शकतो. तितकाच तो विघातकही असू शकतो. जसे हा जिवंत रोबो तुम्हाला हवे ते घरकाम करू शकतो तसाच तुमच्यावर पाळतही ठेवू शकतो. त्यामुळे या नव्या जीवजग निर्मितीबद्दल, त्यातून उद्भवणार्‍या नीतिमत्तेच्या प्रश्नांबद्दल बोलायला हवे. हे सर्व फार दूर नाही. लक्षात घ्या 20-25 वर्षांपूर्वी मोबाईल आला आणि त्यातून आलेल्या सोशल मीडियाच्या सहाय्याने आज देशाची सरकारे कोसळू शकतात, अफवा पसरवू शकतात, दंगली घडवल्या जाऊ शकतात. तसेच जिवंत रोबोच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे विश्व उद्या येणार आहे, याचा विचारच केलेला बरा.

आज एक झेनोबोट निर्माण झाला. उद्या हाच झेनोबोट स्वतःपासून नवी जीवनिर्मिती करेल. ती शेकड्यात, हजारात नव्हे तर लाखात, कोटींमध्ये असेल. एका नव्या जगाच्या निर्मितीची बिजे यात आहेत. या जिवंत रोबोना कशा प्रकारच्या भावभावना असतील? त्यांना आवडणारे संगीत कुठले असेल? ते कोणत्या प्रकारच्या साहित्याचा आस्वाद घेतील? ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या पद्धती कशा असतील? आठ तास काम केल्यानंतर त्यांना आपल्यासारखा थकवा येईल की ते आर्टिफिशियल रोबोसारखे चोवीस तास काम करू शकतील? आणि नैसर्गिकरीत्या जन्माला आलेली मानवजात ही प्रयोगशाळेत जन्माला आलेल्या या जिवंत रोबोबरोबर कसा संवाद साधणार? जन्मतःच जर विशेष गुण शरीररचना घेऊन हे जिवंत रोबो आमच्या स्पर्धेत आले तर आपला काय पाड लागणार… कसे असेल आमचे सहजीवन.. एकत्र गुण्यागोविंदाने नांदणारे की एकमेकांचा विनाश करणारे.. समोर आलेली व्यक्ती जिवंत रोबो आहे हे कसे ओळखणार? असे हजारोंनी जिवंत रोबोज निर्माण झाले तर आताच्या बेरोजगारीचे काय होईल? असमानता पसरेल त्याचे काय? ज्या देशात असे जिवंत रोबो निर्माण होतील त्यांचे नागरिकत्व कोणत्या देशाचे? मानव जशा चुका करतात तशा चुका जिवंत रोबोंनी केल्या तर त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील. अशा जिवंत रोबोंच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्यापासूनच्या सुरक्षिततेचे कोणते उपाय असतील, हेही पाहावे लागेल आणि मग या संपूर्ण व्यवस्थेवर माणसांचे नियंत्रण असेल की जिवंत रोबोंचे, हाही प्रश्न असेल…

विशेष

– उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

- Advertisment -

ताज्या बातम्या