Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर80 बिलात 8 लाख वसुलीपात्र

80 बिलात 8 लाख वसुलीपात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना उपचारांमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये लुटीच्या तक्रारी आल्यानंतर कलेक्टरांनी स्थापन केलेल्या समितीने 211 बिलांपैंकी 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे.

- Advertisement -

त्यात सुमारे साडेआठ लाख रुपयांची रक्कम वसुलीस पात्र असल्याचा शेरा नोंदविण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी करणार्‍या 8 हॉस्पिटलला प्रशासनाने नोटीस पाठवित खुलासा मागविला आहे.

करोनाग्रस्तांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये जास्त बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याकडे गेल्या. त्यांनी सहा पथके व एक समिती नियुक्त करत एख लाखांपुढील बिलांची तपासणी करण्याचे आदेश दिले.

उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे 211 बिलं तपासणीसाठी आली. त्यातील 80 बिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात 8 हॉस्पिटलकडून 8 लाख 63 हजार रुपयांची रक्कम जादा आकारण्यात आली असून ती वसुलीस पात्र असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

आता समितीने या हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस धाडली आहे. जास्त बिलाच्या आकारणीबाबत त्यांचे म्हणणे समितीसमोर आल्यानंतर अंतिम अहवाल तयार होईल. त्यानंतर तो कलेक्टरांकडे जाईल. कोणत्या हॉस्पिटलकडून किती रक्कम वसुल करायची याचा अंतिम निर्णय कलेक्टर राहुल द्विवेदी हे घेतील अशी माहिती समितीच्या अध्यक्षा पल्लवी निर्मळ यांनी दिली.

जादा बिल आकारणी करणारे हॉस्पिटल हे सावेडी भागातील आहेत. एका हॉस्पिटलने तर पीपीई किट, जेवण खर्च, ऑक्सिजन चार्जेस, मॉनिटर चार्जेस, सहाय्यक डॉक्टर चार्जेस, पॅथॉलाजी चार्जेस लावल्याचे तपासणी केलेल्या बिलांतून समोर आले आहे.

हॉटेलमधील सेंटरची माहिती ब्लँक

सावेडीतील हॉटेलमध्ये कोवीड उपचार सेंटर सुरू करणार्‍या डॉक्टरांनी समितीकडे अजूनपर्यंत कोणतीच माहिती सादर केलेली नाही. हॉटेलमध्ये उपचारासाठी येणार्‍या बाधितांकडून अगोदर डिपॉझिट घेतल्याशिवाय त्यांना एन्ट्रीच दिली जात नाही. उपचारात व्यस्त असल्यामुळे हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कोवीड उपचार सेंटरने माहिती दिली नसावी असा अंदाज बांधला जात आहे. मात्र समितीने या सेंटरसह सक्कर चौकातील एका हॉस्पिटलला माहिती न दिल्याने नोटीस बजावली आहे. तारकपूर भागातील एक हॉस्पिटल तर समितीला माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. वारंवार संपर्क करूनही या हॉस्पिटलकडून माहिती दिली जात नाही, त्यामुळे याही हॉस्पिटलला समितीने नोटीस बजावली आहे.

समिती करणार विवेचन

खासगी हॉस्पिटलमधील 211 बिलांपैंकी 80 बिलांची तपासणी समितीने केली. त्यातील 55 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटी आणि वसुलीस पात्र रक्कम असलेल्या हॉस्पिटल प्रशासनाला समितीने नोटीसा धाडल्या आहेत. जादा बिल आकारणीबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. समितीसमोर खुलासा आल्यानंतर त्याचे विवेचन केले जाईल. त्यानंतर अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे.

सतराशे बाधित

नगर शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू असून बाधित असलेल्यांपैंकी 1 हजार 691 रुग्णांनी खासगी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यातील 1 हजार 245 बाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तपासणी समितीने 30 हॉस्पिटलमध्ये पथके नियुक्त करत त्यांच्यामार्फत तपासणी सुरू केली आहे. 30 मधील सुमारे 7 हॉस्पिटलमध्ये एकाही रुग्णांवर उपचार झालेले नाहीत. तीन हॉस्पिटलमध्ये बिल ही एक लाखाच्या आतील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या