सुरगाण्यात डॉक्टर क्वारंटाईन असल्याने कोविड केंद्र बंद

सुरगाणा । Suragana

सुरगाणा येथे साठ खाटांची सुविधा असलेले एक कोविड सेंटर आहे. मुलांच्या शासकीय वसतीगृहात ही व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या कोविड सेंटरमध्ये 33 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे तर 307 रुग्ण होमक्वारंटाईन असून त्यांच्या उपचार सुरु आहे. दररोज सकाळी आरोग्य सेविका विलगीकरणात असलेल्या अशा रुग्णांची तपासणी करुन घेत आहे.

सुरगाणा शहरासह तालुक्यात बोरगाव, आमदा, पळसन, अलंगुण अशा काही गावांमध्ये रुग्णसंख्या वाढली. सध्या येथील स्थिती आटोक्यात असून नागरिकांमध्ये करोनाबाबत जनजागृती केली जात आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. सुरगाणा येथे सध्या साठ खाटांची सुविधा असलेले एक कोविड सेंटर आहे तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास येथील ग्रामीण रुग्णालय कोेविड सेंटर केले जाणार असून त्यादृष्टीने ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली. मात्र येथे असलेले हे एकमेव डॉक्टर हे क्वारंटाईन असल्याने हे सेंटर सुरु करण्यात आलेले नाही. खबरदारी म्हणून मुलींचे शासकीय वसतीगृह देखील ताब्यात घेण्यात आले असून येथेही किमान पन्नास रुग्ण उपचार घेऊ शकतात. याठिकाणी एकही खाजगी कोविड सेंटर नाही. सध्या तरी तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. तरीही स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांवर नजर

सुरगाणा शहरात एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 764 असून यापैकी 209 नगरपंचायत हद्दीतील आहेत. त्यातील 64 रुग्ण उपचार घेत आहे. तालुका परिसरात 555 रुग्णसंख्या असून 289 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 409 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. होम क्वारंटाईन 307 आहेत. एकुण कंटेन्मेंट झोन 130 आहेत, तर अ‍ॅक्टिव कंटेन्मेंट झोन 18 आहेत. या कंटन्मेंट झोनमध्ये येणारी लोकसंख्या 3773 असून त्यासाठी आरोग्य विभागाची 18 पथके लक्ष ठेवून आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *