कोव्हिड सेंटर उभारणीसाठी मनपाला दहा कोटींचा निधी द्या

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्णांसाठी उपचारासाठी व नवीन कोव्हिड सेंटर उभारणीकरिता 10 कोटी रुपये मनपाला द्यावे, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, करोनाच्या संकट काळातही पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ राजकारण करीत आहेत. जिल्ह्याचा भार मनपाच्या माथी मारला जातोय. जिल्हा रुग्णालयाला 18 कोटी रूपये देणार्‍या जिल्हा प्रशासनाने महापालिकेला मात्र, छदामही दिलेला नाही. मात्र, तरीही कोणतीही तक्रार न करता वित्त आयोगातून हा भार उचलला जात आहे.

पालकमंत्र्यांनी आजपर्यंतच्या एकाही बैठकीला महापौर म्हणून बोलावले नाही. भाजपचा महापौर म्हणून पालकमंत्री मला डावलून करोना काळातही राजकारण करीत असल्याचा आरोप महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते.

शहरात करोनाचे संकट मोठे आहे. मनपा यात कोठेही कमी पडलेली नाही. महापालिकेचे मनुष्यबळ आणि सिव्हीलचे मनुष्य बळाची तुलना कोणी करत नाही. अपुरा वैद्यकीय स्टाफ असतानाही आनंद कोव्हिड सेंटर, तंत्रनिकेतन, बूथ, एम्स, नटराज हॉटेल येथे कोवीड सेंटर सुरू केले. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजुंना मदत सुरू आहे.

बाधितांवरील उपचारासोबतच अत्यंविधीचे कामही महापालिका करते आहे. नगर शहर हद्द असली तरी अत्यंविधीसाठी मात्र, जिल्हाभरातील काम मनपाच्या माथी मारले जाते. आयुक्त-वैद्यकीय अधिकारी व प्रशासनासोबत रोज माझ्या बैठका सुरू आहते. रात्रंदिवस पळापळ सुरू आहे. नियोजन सुरू आहे.

रात्री अपरात्री मी स्वत: करोना कामात प्रशासनाच्या कामात धावून जातो. जिल्हा प्रशासनानाचा एक रुपयाचा निधी महापालिकेला मिळालेला नाही. सिव्हील हॉस्पिटलकडे इतका मोठा स्टाफ असताना त्यांनी वेगळे काय केले? असा सवाल महापौर वाकळे यांनी उपस्थित केला.

लवकरच नवे कोव्हिड केअर सेंटर

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शववाहिनी खरेदी करावी. तेथे त्यांनीच करोनामृतांवर अत्यसंस्काराची सुविधा करावी अशी अपेक्षा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष गंधे यांनी व्यक्त केली. भाजपच्यावतीने नगर शहरात नव्याने कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचा विचार असून लवकरच ते सुरू होईल असे ते म्हणाले. पालकमंत्री मुश्रीफ हे भाजपचे महापौर म्हणून वाकळे यांना डावलत असतील तर ते राजकारण करत असल्याचा आरोप गंधे यांनीही केला.

Share This Article