Tuesday, May 14, 2024
Homeनगरकरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांनी उभारला ऑक्सिजन प्रकल्प

करोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांनी उभारला ऑक्सिजन प्रकल्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपुर्ण झाला आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनसाठी मोठी कसरत करावी लागली. भविष्यातील धोका व गरज ओळखून हा प्रकल्प रुग्णांसाठी आधार व राज्यासाठी पथदर्शी ठरणार असल्याची भावना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

करोनाच्या दुसर्या लाटेत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा व भविष्यातील गरज ओळखून इंडियन मेडिकल असोसिएशन नगर व शहरातील साईदीप, श्रीदीप, न्यूक्लियस, मॅक केअर आणि स्वास्थ्य या हॉस्पिटलने एकत्र येऊन एमआयडीसी येथे स्वामी एअर प्रॉडक्ट्स या नावाने जिल्ह्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर्सचे चेअरमन अरविंद पारगावकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, डॉ.एस. एस.दीपक, हरजितसिंह वधवा, नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक डॉ. सतीश सोनवणे यांनी करोनाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत असताना डॉक्टरांसह अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले होते.

शहरातील डॉक्टरांनी एकत्र येऊन जिल्ह्याला ऑक्सिजनसाठी स्वयंपुर्ण बनविले असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची पहाणी केली. यावेळी डॉ. अमित बडवे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. आनंद काशिद, डॉ. सचिन घुले, डॉ. गोपाळ बहरुपी, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. विजय निकम, डॉ. किरण दीपक, ओमकार तांबोळी, डॉ. मोहंमद माजीद, आनंद बोरा, जस्मित वधवा, राकेश गांधी, सुधीर लांडगे, प्रशांत मुनोत, डॉ. रेणुका पाठक, डॉ. वारे, डॉ. सतीश सुपेकर, डॉ. गणेश झरेकर, सागर निंबाळकर, सीए पराग मुथा, दर्शन सोनी, मनोज देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार डॉ. अभिजित पाठक यांनी मानले.

शहरातील एमआयडीसी येथे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानयुक्त जिल्ह्यातील सर्वात मोठे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाने जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज पुर्णत: भागणार आहे. महाराष्ट्रातील हा तिसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे. 20 हजार लीटर ऑक्सिजन क्षमतेचे ऑक्सिजन टँक असून, दररोज सहा मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. 99 टक्के शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरवण्यात येणार आहे. ऑक्सिजनची शुध्दता तपासण्यासाठी देखील अद्यावत तंत्रज्ञानयुक्त टेस्टिंग लॅब उभारण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका टाळता येणार आहे. हायड्रोलिक पध्दतीने वाहनांमध्ये ऑक्सिजन टाक्या भरुन हॉस्पिटलला पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या