Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यान्यायालयाच्या निकालाने सत्ताधारी भाजपला धक्का

न्यायालयाच्या निकालाने सत्ताधारी भाजपला धक्का

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी सभापती पदाच्या निवडीवरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत शिवसेनेच्या बाजुने निकाल लागला आहे. स्थायीवरील सत्ताधार्‍यांचे बहुमत संपुष्टात आले आहे.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आज हा निकाल दिला. यात शिवसेनेच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या असून यानुसार आता सत्ताधार्‍यांना स्थायी सदस्यांत बदल करावा लागणार असून या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे संख्याबळ 66 वरुन 64 वर आल्याने स्थायी समितीतील नऊ सदस्यांकरिता लागणारे तौलाणिक संख्याबळ घटले आहे. यात तत्कालीन भाजपच्या सरोज अहिरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर शांताबाई हिरे यांचे निधन झाले होते. असे असतांना महापौर सतिश कुलकर्णी यांची 5 मार्च 2020 रोजी झालेल्या स्थायी सदस्य निवडीच्या विशेष महासभेत भाजपचा एक सदस्य जास्त जाहीर केला होता. यानिवडीच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

यात न्यायालयाने सभापती निवडणुकीला काही काळ स्थगिती दिल्यानंतर 3 एप्रिलला न्यायालयाने निवडणुक निर्णय अधिकार्‍यांना निकाल जाहीर करण्याचे निर्देश देत याचिकेचे पुढील कामकाज सुरू ठेवले होते. यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सभापती म्हणुन भाजपचे गणेश गिते यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होतेे. आता न्यायालयात यावर सुनावणी पुर्ण होऊन शिवसेनेचे बोरस्ते यांच्या याचिकेतील दोन्ही मागण्या न्यायमुर्तींनी मान्य केल्या आहे.

यामुळे आता सत्ताधारी भाजपला स्थायी सदस्य निवडीचा करण्यात आलेल्या 196 क्रमांकाच्या ठरावातील जास्त असलेल्या सदस्यांना कमी करुन त्याऐवजी शिवसेनेच्या सदस्यांचे नाव घोषीत करावे लागणार आहे. तसेच तत्काळीन नगरसेवक वसंत गिते व अ‍ॅड. जे. टी. शिंदे यांच्या पुर्वीच्या याचिकेत न्यायालयाने स्थायी सदस्य निवडीसाठी दिलेल्या निर्देशानुसार पुढची निवड केली जावी, असे आदेशही न्यायांलयाने दिले आहे. यात शिवसेनेच्यावतीने अ‍ॅड. विशाल देशमुख यांनी काम पाहिले.

दरम्यान विद्यमान सभापती गणेश गिते यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यत म्हणजे एक महिना शिल्लक आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यत सभापती गिते हे कार्यकाळ पुर्ण करतील, मात्र आता पुढचे स्थायी सभापतीपद विरोधकांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निकाल अभ्यासून पुढील निर्णय – महापौर

मुंबंई उच्च न्यायालयाने स्थायी सदस्य निवडीसंदर्भात आज निकाल दिला असला तरी त्यांची प्रत अद्याप आपल्याला मिळालेली नाही. आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तिचा कायदेतज्ज्ञांकडून अभ्यास केला जाईल, यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रीया महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली.

सत्य परेशान होता है, पराजित नही – बोरस्ते

नाशिक मनपात भाजपचे सख्याबळ घटले हे वास्तव असतांना याकडे दुर्लक्ष करीत महापौरांनी स्थायीत सेनेचा एक सदस्य डावलला होता. या निकालाने सत्य परेशान होता है, पराजित नही… हे सिध्द झाले असुन आता तरी महापौरांनी हेकेखोरपणा सोडावा. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असुन आता महापौरांनी तातडीने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अन्यंथा आम्हाला महापौरांच्या विरोधात पुन्हा रिटपिटीशियन दाखल करावी लागेल, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या