Friday, April 26, 2024
Homeनगरनकली तंबाखू तयार करणार्‍यांवर गुन्हा दाखल

नकली तंबाखू तयार करणार्‍यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

संगमनेर तालुक्यातील फास्टट्रॅक पॅकर्स प्रा. लि. या कंपनीची नकली मोहर व नकली चिन्हाचा वापर करून बनावट गायछाप निर्मिती करणार्‍या दोघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा बनावटीचा प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात एका पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू होता.

- Advertisement -

पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून तीन लाख 11 हजार 600 रुपये किमतीची बनावट तंबाखू जप्त केली आहे. नदीम जहीर खान ऊर्फ शेख, जब्बार शमशुद्दीन शेख (वय-30, दोघे रा. मुकुंदनगर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कंपनीचे डेपो मॅनेजर संकल्प नंदकिशोर लाहोटी (वय-26, रा. आश्वी बु. ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील फास्टट्रॅक पॅकर्स प्रा. लि. ही कंपनी गायछाप निर्मिती करते. जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून या गायछापला मोठी मागणी आहे. यामुळे काही व्यक्तींनी मागणीचा गैरफायदा घेत बनावट धंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. नदीम खान व जब्बार शेख यांनी फास्टट्रॅक पॅकर्स प्रा. लि. या कंपनीचे नकली मोहर व नकली चिन्हाचा वापर करून पॅकिंगचे बनावट कागद तयार केले.

हे कागद गायछाप पुडीला चिकटवून त्या पुडीत हलक्या प्रतीची तंबाखू भरली जात होती. करोना काळात गायछापची वाढती मागणी लक्षात घेऊन या बनावट गायछाप बाजारात विकल्या जात होत्या. फास्टट्रॅक कंपनीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी चिचोंडी पाटील शिवारात पिंपळा रोडवर एका पोल्ट्री फॉमवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांच्या हा बनावटीचा प्रकार लक्षात आला. त्या ठिकणी बनावट लेबल लावून तयार केलेले तीन लाख 11 हजार 600 रुपये किमतीचे तंबाखू पॅकेट आढळून आले. पोलिसांनी ती तंबाखू जप्त केली आहे. तसेच खान व शेख विरोधात भादंवि 420, 467, 468, 469, 472, 475 सह कॉफी राईट अ‍ॅक्ट कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या