कपाशी उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत

jalgaon-digital
2 Min Read

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

यावर्षी कमी पाऊस व अतिउन्हामुळे कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात पातेगळ झाली असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच कपाशीला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

नेवासा तालुक्यात मागील वर्षी सुरुवातीला कापसाला चांगला दर होता. मात्र यानंतर दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. दराच्या आशेने अगदी जूनपर्यंत कापूस शेतकर्‍यांनी घरात ठेवूनही उपयोग झाला नाही. तरीही यंदा कापसाची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र या वर्षी कमी पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. कपाशी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तालुक्यात जवळपास 29 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. कमी पावसामुळे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. परतीच्या पावसाने देखील या भागात ओढ दिल्याने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन कमी प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. तर आज चार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दर सांगण्यात येत आहे, त्यामुळे काही शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्च देखील निघून येतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कापसापाठोपाठ सोयाबीन पिकाने क्षेत्र व्यापून घेतले. मात्र सोयाबीन पिकाच्या उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याचे शेतकरी बोलत आहे. सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली असून एकरी सहा ते आठ क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन पिकांचे दर तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळत आहे. अजून बर्‍याच शेतकर्‍यांना तर आपली सोयाबीन पीक तयार करून बाजारात विकण्यासाठी आणायचे आहे. त्यात अजून दर कोसळण्याची धास्ती शेतकर्‍यांनी घेतली आहे.

कपाशीच्या लागवडी उशीरा झाल्याने कापूस देखील अजून या भागात फुटला नाही, पण आज रोजी कपाशीचे दर साडेपाच हजारापर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामात नकदीचे पिके म्हणून सोयाबीन व कपाशी पिके प्रामुख्याने घेतली पण जवळपास दोन्ही पिकांचे दर एकच पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिके आणू पर्यंत झालेला खर्च देखील निघतो की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *