Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशराजकीय पक्षांना उद्योगपतींकडून 876 कोटींची देणगी

राजकीय पक्षांना उद्योगपतींकडून 876 कोटींची देणगी

नवी दिल्ली –

एडीआरच्या (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म) अहवालानुसार, 2018-19 मध्ये कॉर्पोरेट आणि उद्योगपतींच्या घरण्यांकडून देशातील राजकीय पक्षांना

- Advertisement -

876 कोटींची देणगी दिली गेली. सर्वाधिक देणगी मिळवण्यामध्ये भाजपा प्रथम क्रमांकावर आणि त्यानंतर काँग्रेस आहे, असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भाजपाला उद्योगपतींकडून 698 कोटींची देणगी मिळाली, तर काँग्रेसला एकूण 122.5 कोटी रुपये मिळाले व या यादीत काँग्रेस दुसर्‍या स्थानावर आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारावर एडीआरने अधिक माहिती दिली आहे.

ही रक्कम 2018-19 या आर्थिक वर्षात विविध राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण देणगींपैकी सुमारे 92 टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाच राष्ट्रीय राजकीय पक्षांपैकी भाजपाला 1573 कॉर्पोरेट दात्यांकडून 698 कोटी रुपयांची, तर काँग्रेसला 122 कॉर्पोरेट कंपन्यांकडून 122.5 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 17 कॉर्पोरेटकडून 11.345 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली, असे एडीआरने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एकूण 319 देणग्यांमधून राष्ट्रीय पक्षांना 31.42 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पण या देणग्यांचे फॉर्ममध्ये विवरण नाही. याशिवाय राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या 34 देणग्यांमधून 13.57 कोटी रुपये मिळाले. पण, यांचेही पॅन विवरण नाही. ज्या देणगीदारांनी किमान 20 हजार रुपयांपर्यंत देणगी दिली आहे, त्यांनी आपले पॅन विवरण देण्याची गरज आहे, असे एडीआरने आपल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रीय पक्षांना 274 कॉर्पोरेट देणगीदारांकडून पॅन क्रमांक न देता एकूण 13.364 कोटी रुपयांची देणगी दिली गेली आहे. अशा अपूर्ण देणग्यांचे अहवाल निवडणूक आयोगाने पक्षांना परत केले पाहिजेत. यामुळे अशी अपूर्ण माहिती पुरवण्यापासून त्यांना रोखता येईल, असे एडीआरने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या