Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोना संकट : दिल्लीत एका आठवड्याचा 'कर्फ्यू' तर देशव्यापी लॉकडाऊनबाबत गृहमंत्री अमित...

करोना संकट : दिल्लीत एका आठवड्याचा ‘कर्फ्यू’ तर देशव्यापी लॉकडाऊनबाबत गृहमंत्री अमित शहा म्हणतात…

दिल्ली | Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ आज समोर आली आहे.

- Advertisement -

त्यातच राजधानी दिल्लीतही करोनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. रोज करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये यापूर्वीच शनिवार व रविवार कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, शहरात १०० पेक्षा कमी आयसीयू बेड शिल्लक आहेत. त्यातच सरकारी शाळा ह्या कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान करोनाच्या मोठ्या प्रमाणात वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाउनच्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बंधांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आता राज्यांच्या हातात देण्यात आला आहे. सर्व राज्यांतील सरकार आपापल्या हिशोबानं निर्णय घेत आहेत, असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय.

गेल्या तीन महिन्यांपासून निर्बंधाचे अधिकारी आम्ही राज्यांना सोपवले आहेत. कारण प्रत्येक राज्यातील करोना परिस्थिती एकसमान नाही. त्यामुळे राज्य सरकारनं आपापल्या ठिकाणची परिस्थिती ध्यानात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे, असं अमित शहा यांनी म्हटलंय.

तसेच, गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे. आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होता. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शाह यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या