Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधकरोनाची ऐशीतैशी!

करोनाची ऐशीतैशी!

गेल्या काही दिवसांमध्ये करोना या महामारीशी संबंधित तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामुळे लोकांची मानसिकता किती सावध आणि सैरभैरही झालेली आहे, हे या घटनांवरून दिसून येईल. पहिली म्हणजे या महामारी संबंधित नियमांचे, निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी म्हणजे जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने लसीकरणाला आपला उघड विरोध दर्शवून ऑस्ट्रेलियन जनतेचा रोष ओढवून घेतला. कॅनडाच्या पंतप्रधानांवर या महामारीमुळे आपले निवासस्थान सोडून पळून जावे लागण्याचा प्रसंग ओढवला.

जगभरात करोना व्हेरिएंटमुळे संसर्ग होणे सुरूच आहे. या महामारीकाळातील सार्वजनिक निर्बंधांना लोक वैतागले असले तरी हे निर्बंध आवश्यक आहेत आणि लसीकरणालाही थोडा विरोध होत असला तरी दोन डोस आणि आता सुरू असलेला बूस्टर डोस यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले असून संसर्गाचे प्रमाणही कमी होत आहे, असा जागतिक संशोधकांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये या महामारीसंबंधित तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामुळे लोकांची मानसिकता किती सावध आणि सैरभैरही झालेली आहे, हे या घटनांवरून दिसून येईल.

पहिली प्रमुख घटना म्हणजे या महामारीसंबंधित नियमांचे, निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने लसीकरणाला आपला उघड विरोध दर्शवून ऑस्ट्रेलियन जनतेचा रोष ओढवून घेतला. त्याला ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत त्याला भाग घेता आला नाही. तिसरी महत्त्वाची घटना आहे, कॅनडामध्ये लॉकडाऊनच्या निषेधार्थ हजारो ट्रकचालकांनी पंतप्रधान जस्टिन टुडो यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्यामुळे पंतप्रधानांना सुरक्षेच्या कारणास्तव आपले घर सोडून कुटुंबियांसह इतर ठिकाणी पळून जावे लागेल. या अचंबित करणार्‍या घटना वाटतीलही पण या महामारीचे गांभीर्य असलेले एका बाजूला आणि गांभीर्य नसलेले किंवा महामारीसंदर्भातील सततच्या निर्बंधांना वैतागलेले एका बाजूला अशी परिस्थिती दिसून येत आहे.

- Advertisement -

सर्वप्रथम आपण या वर्षाच्या जानेवारीतच ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत घडलेले नोव्हाक जोकोविच प्रकरण काय आहे ते पाहू. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर एकेरीची प्रत्येकी वीस ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे आहेत. 40 वर्षीय फेडरर जवळ जवळ निवृत्तीच्या मार्गावर आहे तर 36 वर्षीय नदाल आणि 34 वर्षीय जोकोविच यांच्यात एकेरीची सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पण लसीकरणाला असलेल्या विरोधामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत भाग घेता आला नाही आणि स्पेनच्या राफेल नदालने जोकोविच आणि फेडरर यांना मागे टाकून आपले विक्रमी 21 वे ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपद मिळवले. पण नदालपेक्षा जास्त चर्चेत राहिला तो नोव्हाक जोकोविचच! जगामध्ये काही लोकांचा लसीकरणाला, करोना नियमावली आणि निर्बंधांना विरोध आहे. त्यापैकीच टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा एक आहे. विशेष म्हणजे जोकोविच ज्या देशात राहतो त्या सर्बियामध्ये 50 टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. पण जोकोविचने लस घेतलेली नाही. जोकोविचचा मास्क बांधण्यासही विरोध आहे. ‘तो गैरसमज निर्माण करत आहे’, अशी त्याच्याच देशात त्याच्यावर टीका होत आहे. विशेष म्हणजे त्याला करोनाचा संसर्गही होऊन गेला आहे. लस न घेता आपण नैसर्गिकरीत्या बरे होऊ शकतो, असा त्याला विश्वास आहे. लस न घेतलेला हा टेनिसपटू वेगवेगळ्या देशांमधील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी फिरत असतो. पण आता या देशांमधील करोनाविषयक नियम, कायदे अधिक कडक झाल्यामुळे त्याच्या सहभागावर अडथळे येऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये प्रारंभी सवलत म्हणून जोकोविचला प्रवेश देण्यात आला़. पण त्यामुळे ऑस्ट्रेलियन जनतेमध्ये रोष निर्माण झाला. हे प्रकरण एवढे गाजले की ते संसद, न्यायालय आणि पंतप्रधानांपर्यंत गेले आणि जोकोविचला हद्दपार करण्यात आले. शेवटी ही स्पर्धा न खेळताच जोकोविचला मायदेशी परतावे लागले. विशेष म्हणजे करोनावरील औषधे निर्माण करणार्‍या एका डॅनिश कंपनीमध्ये जोकोविचची 80 टक्के भागीदारी आहे. जोकोविचप्रमाणे त्याची पत्नी येलेना हिचाही लसीकरणाला विरोध आहे. करोना विषाणूंच्या प्रसारास ‘फाईव्ह जी’ कारणीभूत आहे, या तिच्या इन्स्टाग्रामवरील विचित्र मजकुरामुळे वाद निर्माण झाला होता. नेटकर्‍यांनी तिची टर उडवली होती.

नोव्हाक जोकोविचच्या या भूमिकेमुळे भविष्यातील स्पर्धांमधील त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 22 मेपासून सुरू होणारी फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा आणि 27 जूनपासून सुरू होणारी विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जोकोविचसाठी फार महत्त्वाच्या आहेत. कारण या दोन स्पर्धांचे अजिंक्यपद मिळवून तो नदालला सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदांच्या बाबतीत मागे टाकू शकतो. पण फ्रान्सच्या संसदेने नुकतीच 16 वर्षांवरील लोकांना स्टेडियमसह इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे, या कायद्याला अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे जोकोविचच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय नदाल हा क्ले कोर्टचा राजा आहे. त्यामुळे पॅरिसमध्ये तो आपले 22 वे ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपद मिळवू शकतो. आंद्रे रुबलोव, इलीना स्वितोलीना अशा काही टेनिसपटूंनीही लसीकरणाला विरोध दर्शवला आहे. पुरुष आणि महिलांच्या जागतिक टेनिस संघटनांनी टेनिसपटूंना लस घेण्याचे आवाहन केले आहे पण आम्ही त्यांच्यावर सक्ती करणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे.

जोकोविच विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भाग घेऊ शकेल, कारण तेथील कायदा तशी त्याला परवानगी देणारा आहे. पण याच करोनामुळे ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आपले आसन टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांचे ‘पार्टिगेट’ प्रकरण सध्या गाजत आहे. लॉकडाऊनच्या काळात नियमावलीचे उल्लंघन करून पंतप्रधानांच्या 10 डाऊनिंग स्ट्रीट या निवासस्थानी 2020 मध्ये पार्टीचे आयोजन केल्याचा आणि सरकारच्या इतर विभागांमध्येसुद्धा गेट-टुगेदर सारखे कार्यक्रम आयोजिल्याचा आरोप बोरीस जॉन्सन यांच्यावरती आहे. याविषयी ब्रिटीश संसदेत त्यांनी माफीही मागितली आहे. विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोहीम सुरू केल्यामुळे जॉन्सन यांचे पंतप्रधानपद जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागी भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे. ब्रिटीश पंतप्रधानांचे भवितव्य सध्या अधांतरी आहे. ब्रिटनमध्ये करोना महामारीमुळे आतापर्यंत सुमारे15 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत.

करोना महामारीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांना पायउतार होण्याची वेळ आली आहे असे दिसत असतानाच कॅनडाच्या पंतप्रधानांवर या महामारीमुळे आपले निवासस्थान सोडून पळून जावे लागण्याचा प्रसंग ओढवला. कॅनडामध्ये लसीकरण आणि लॉकडाऊन यांना ट्रकचालकांनी प्रचंड विरोध केला आहे.पंतप्रधानांच्या निवासस्थानाला सुमारे 80 हजार ट्रक आणि 50 हजार ट्रकचालकांनी घेराव घातला. त्यामुळे पंतप्रधान टुडो यांना आपल्या कुटुंबियांसह निवासस्थान सोडून पळून जावे लागले आणि इतरत्र आसरा घ्यावा लागला. जवळजवळ 70 किलोमीटरपर्यंत ट्रकच्या रांगा लागलेल्या होत्या. या आंदोलकांनी याला ‘फ्रीडम कन व्हाय’ असे नाव दिले आहे. आपण पलायन केलेले नसून आपल्याला कोविडचा संसर्ग झाला असून सध्या आपण विलगीकरणामध्ये आहोत, असे स्पष्टीकरण टुडो यांनी दिले आहे. ज्या टुडोंनी भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, त्याच टुडोंना आता आपल्या देशातील ट्रकचालकांच्या आंदोलनांना तोंड द्यावे लागत आहे आणि या आंदोलकांना मी भीक घालत नाही, असे उद्दाम उद्गार त्यांनी काढले आहेत. त्यामुळे भारतीय नेटकर्‍यांनी ‘भोगा आता कर्माची फळं’ अशी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर करोना महामारीचा प्रवास सध्या ओमायक्रॉनपर्यंत आला आहे. या महामारीच्या सावटातच जगभरातील दैनंदिन जीवन सुरू आहे. जरी अधूनमधून निर्बंध लागत असले तरी उत्सव, कार्यक्रम, समारंभ, निवडणूक प्रचार वगैरे सुरू आहेत. या महामारीमुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण जरी कमी असले तरी आणि त्यातून बरे होणार्‍यांचे प्रमाण कितीतरी पटीने जास्त असले तरी या महामारीवर रामबाण औषध केव्हा मिळणार, असा प्रश्न पडलेला आहे आणि असे रामबाण औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांना यश मिळेल अशी आशा आहे!

प्रसाद वि.प्रभू

ज्येष्ठ पत्रकार

- Advertisment -

ताज्या बातम्या