Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रहाफकिनकडून करोनाची लस निर्मिती

हाफकिनकडून करोनाची लस निर्मिती

मुंबई । प्रतिनिधी

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्च करून मुंबईत नवीन प्लँट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यातील लसीकरणाला वेग दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिटयूटला भेट देऊन प्रयोगशाळेची पहाणीही केली. त्यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक असून यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे.

हाफकिन संस्थेच्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उत्कृष्ट दर्जाच्या लसीची निर्मिती आणि पुरवठा करण्यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोबरच कोविड लस निर्मितीसाठी आयसीएमआर आणि भारत बायोटेक लिमिटेडकडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करावे. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश तत्वावर हाफकीनला काम करता येईल, त्यामुळे १२ कोटी कोविड लसींचे उत्पादन हाफकिनमार्फत होईल. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतर उत्पादकांशीही बोलणी

हाफकिन संस्थेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता तपासून घ्याव्यात. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्याची सुचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

अन्य लसींचेही उत्पादन

पहिल्या टप्प्यात भारत बायोटेकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कुप्यांमध्ये भरून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन दिली जाईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्यावतीने होते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल. भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

जैव वैद्यकीय संशोधन केंद्र

कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कोविड लसीकरण करण्यावर भर देण्यात आहे. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राकडे पाठपुरावा

देशातील काही राज्यातील कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिटयूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या