Tuesday, May 14, 2024
Homeनगरनगरकरांची करोना लसीकरणाकडे पाठ!

नगरकरांची करोना लसीकरणाकडे पाठ!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जसजसा कोविडचा प्रभाव कमी होत आहे, तसतसे करोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकडे नगरकर पाठ फिरवतांना दिसत आहेत. यामुळे जिल्ह्यात दैनदिन लसीकरण हे एक हजारांच्या आत आले असून अनेक ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक लसीकरणासाठी नागरिकांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि कॉर्बेव्हॅक्स या करोना प्रतिबंधात्मक लसींचा 2 लाख 42 हजार 320 डोस पडून आहेत.

- Advertisement -

करोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर जिल्ह्यात लसीकरणासाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. नागरिक वाटेल त्या मार्गाने लस घेण्यासाठी पळपळ करतांना दिसत होते. काही ठिकाणी लसींचा साठा गायब करण्यात येत होता. मात्र, करोनाची लाट ओसरल्यानंतर आता नागरिकांनी लसीकरणाकडे पाठच फिरवली आहे. यामुळे जिल्ह्यात दररोज 100 ते 150 लसीकरणाचे सेशन होतांना दिसत आहे. पूर्वी हा आकडा 400 च्या पुढे होता. दुसरीकडे आजही जिल्ह्यातील 6 लाख 10 हजार 43 लोकांनी करोनाचा एकही डोस घेतलेला नाही. भविष्यात करोनाची लाट उद्भवल्यास त्याचा मोठा फटका लस न घेणार्‍यांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात करोना लसीकरणात सर्वात चांगली कामगिरी 60 वर्षापुढील वय असणार्‍यांची झालेली असून यात 5 लाख 73 हजार 400 व्यक्तींपैकी 5 लाख 73 हजार 314 जणांनी पहिला डोस घेतला असून 4 लाख 64 हजार जणांनी 298 दुसरा तर 44 हजार 834 जणांनी बुस्टर डोसही घेतलेला आहे. या वयोगटातील अवघ्या 131 जणांचे करोना लसीकरण होणे बाकी आहे. आरोग्य कर्मचार्‍यांची करोना लसीकरणाची टक्केवारी चांगली असून आतापर्यंत 45 हजार 259 जणांनी पहिला तर 42 हजार 551 जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. तर फ्रंटलाईन वर्करांमध्ये 60 हजार 147 जणांनी पहिला तर 55 हजार 942 जणांनी दुसरा डोस पूर्ण केलेला आहेत.

18 ते 44 वयोगटातील 22 लाख 17 हजार 900 पैकी 17 लाख 15 हजार जणांनी पहिला तर 12 लाख 77 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. लसीकरणाची टक्केवारी या वर्गवारीची 57.6 टक्के आहे. 45 ते 59 या वयोगटातील 8 लाख 12 हजार 300 पैकी 6 लाख 82 हजारांनी पहिला तर 5 लाख 61 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी 69 टक्के आहे. तर 15 ते 18 वयोगटातील 2 लाख 38 हजारांपैकी 1 लाख 82 हजार 328 जणांनी पहिला तर 1 लाख 35 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी ही 57 टक्के आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली असून 1 लाख 54 हजार जणांपैकी 1 लाख 27 हजार 974 जणांनी पहिला तर 64 हजार 256 जणांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी 41.6 टक्केच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या