करोना चाचणी अहवाल येण्यास महिन्याचा विलंब

jalgaon-digital
1 Min Read

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यात करोना निदानाकरिता घशातील स्त्राव तपासणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे चाचणी अहवाल जवळपास महिनाभराने मिळत आहेत. हे अहवाल वेळेत प्राप्त होत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. त्याचबरोबर वेळेत अहवाल न मिळाल्याने रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत व करोनाचा फैलाव होण्यासही वाव आहे. प्रशासनाने निदान आरोग्य विभागात तरी लाल फितीचा कारभार करू नये, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

पिंपरी निर्मळ येथील अनेक रुग्णांना आरोग्य विभागातील शासकीय हालगर्जीपणाचा अनुभव येत आहे. प्राथमीक आरोग्य केंद्रात घशातील नमुना घेतल्यानंतर तब्बल तीन आठवड्यांनंतर रिपोर्ट मिळत आहेत. रिपोर्ट वेळेत न मिळाल्याने रुग्णावर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना चुकीच्या उपचारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर करोनातून ठणठणीतपणे बरे झाल्यानंतर आपण पॉझिटिव्ह होतो याचा अहवाल प्राप्त होत असल्याने शासकीय पोर्टलवर संबंधित व्यक्ती बाधित दिसत आहे. त्यामुळे करोना बाधित नसतानाही संबंधीत गावची आकडेवारी फुगत आहे. अहवाल वेळेत न मिळाल्याने अनेक रुग्ण निर्धास्तपणे फिरून करोनाचा संसर्ग वाढविण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून चाचणी अहवाल वेळेवर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *