Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर... तर करोना निर्बंध अधिक कडक करणार

… तर करोना निर्बंध अधिक कडक करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे.

- Advertisement -

मात्र करोना वाढत असल्याने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता आवश्यक बनली आहे. आवश्यकता पडली तर करोना प्रतिबंधासाठी निर्बंध अधिक कडक केले जातील, अशा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्हीडिओद्वारे नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बंधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी करोना प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 12 टक्के आहे. त्यात आता वाढ होताना दिसते आहे. 29 जानेवारीचा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत होता. तोच आदेश 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यकता पडली तर त्या आदेशात आणखी निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल. मंदिरे सुरूच राहतील.

मात्र शिर्डीप्रमाणे सर्व मंदिरात नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित व्यवस्थापाने घ्यायची आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करीत मास्क वापरावेत.

जिल्हयात सध्या 5 हजार 500 बेड उपलब्ध आहेत. व्हॉन्टीलेटर, ऑक्सिजन सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आयसीयू सज्ज आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नगरमधील मंगल कार्यालयांमध्ये जावून कारवाई केली आहे. आता या पुढे मंगल कार्यालयात गर्दी दिसली तर ते सील केले जातील. पुढील काही दिवस हे सील उघडले जाणार नाही. मास्क वापरलेले दिसले नाही तर नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

159 रूग्णांची भर

मंगळवारी रूग्ण संख्येत 159 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 899 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 63, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 81 आणि अँटीजेन चाचणीत 15 रुग्ण बाधीत आढळले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 60, अकोले 2, जामखेड 2, कर्जत 3, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 21, नेवासा 1, पारनेर 7, राहाता 7, राहुरी 1, संगमनेर 34, श्रीगोंदा 4, शेवगाव 4, पाथर्डी 1 आणि इतर जिल्ह 4, श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या