Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना काळातही ‘लाचखोरी’चा संसर्ग कायम

करोना काळातही ‘लाचखोरी’चा संसर्ग कायम

अहमदनगर| Ahmednagar| सचिन दसपुते

करोना काळ सुरू होऊन वर्ष लोटले. मार्च 2020 मध्ये आलेला करोना संसर्ग मार्च 2021 मध्येही कायम आहे.

- Advertisement -

करोना दुसर्‍या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांना रुपया म्हणता रुपया मिळेना. सर्वत्र अर्थचक्र ढासळलेले असताना या काळातही जिल्ह्यामध्ये ‘लाचखोरी’ सुसाट असल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या वर्षभरात नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40 सापळे लावून 48 लाचखोर अधिकारी, कर्मचारी गजाआड केले. यात सर्वाधिक कारवाई पोलीस दल व महसूल विभागात करण्यात आल्या. वर्षभराची आकडेवारी पाहता करोनाच्या काळात देखील लाचलुचपत विभागाची दणकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र यातून लाचखोरी देखील तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

करोना संकटकाळात सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी लाचखोरीत आघाडी घेतली आहे. पोलीस विभागाने पहिला क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. 12 सापळा कारवाईत 14 पोलीस घरी गेले आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलिसांसाठी लाच घेणारा एक खाजगी इसमही लाचेच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलीस दलाबरोबर दुसर्‍या क्रमांकावर महसूल विभागात सर्वाधिक लाचेच्या घटना समोर आल्या आहेत. 11 सापळा कारवाईत महसूल विभागातील ‘क्लास थ्री’ च्या नऊ लोकांवर व चार खाजगी इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी लाच स्वीकारताना खाजगी व्यक्तींचा वापर करतात हे स्पष्ट झाले आहे. महसूलच्या लोकांसाठी चार खाजगी लोकांनी लाच घेतली. लाचलुचपत विभागाने त्या चार इसमांना अटक केली होती.

पोलीस, महसूल विभागासह सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येते. यामध्ये आरोग्य, विद्युत, शिक्षण, पाटबंधारे, मनपा, पंचायत समिती, वस्तू व सेवा कर विभाग, भूमिअभिलेख, सहकार, वने यांचा समावेश आहे. करोना काळात ‘फ्रन्टंलाइन वर्कर’ म्हणून काम करणार्‍या आरोग्य विभागात लाचेच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

करोना संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या काळात काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांकडून लाचेची मागणी करत अडवणूक करण्यात आली. करोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, तलाठी, पालिकांसह ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे हात करोना वॉरिअर्स म्हणून काम करत असताना काही भ्रष्ट लोकसेवकांनी लाच घेतली आहे. एकीकडे डॉक्टर, नर्स, पोलीस जिवाची बाजी लावून करोनाशी लढत असताना दुसरीकडे याच काळात लाच घेऊन स्वतः ची घरे भरण्याचे काम काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत.

खाते सापळा कारवाई अटक आरोपी

पोलीस 12 15

महसूल 11 13

विद्युत 04 04

आरोग्य 03 03

पाटबंधारे 02 02

शिक्षण 02 02

मनपा 01 01

वने 01 03

सहकार 01 01

वस्तू व सेवा कर 01 02

भूमिअभिलेख 01 01

पंचायत समिती 01 01

एकुण 40 48

- Advertisment -

ताज्या बातम्या