Saturday, April 27, 2024
Homeनगरकरोनाकाळातही बचत गटांनी शोधला उन्नतीचा मार्ग!

करोनाकाळातही बचत गटांनी शोधला उन्नतीचा मार्ग!

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

2020 हे वर्ष करोना संसर्गामुळे सर्वांसाठी चिंताजनक गेले. करोना लॉकडाऊनमुळे हजारोंचे रोजगार गेले.

- Advertisement -

या काळात जिल्ह्यातील महिला बचत गटांनी करोना आपत्तीला इष्टाआपत्ती मानून कापडी मास्कची निर्मिती केली. या काळात 1 हजार महिलांना रोजगार मिळाला. मास्क निर्मितीतून बचत गटांनी 71 लाखांचा व्यवसाय केला. 2020 या संकटाच्या वर्षात ही कामगिरी आशादायी ठरली.

करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाले. व्यवसाय, उद्योग, रोजगार बंद पडले. परंतु, महिला बचतगटांनी करोनाच्या संकटाला इष्टापत्ती समजून धीराने सामोरे जात या काळात मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती केली. जिल्ह्यातील 114 बचतगटांनी 5 लाख 45 मास्क निर्मिती केली. यातून 71 लाख 25 हजारांचे उत्पन्न मिळाले. जिल्ह्यातील 1 हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला.

महिला बचतगटांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादनांची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी जिल्हास्तरावर मार्केटिंग अधिकार्‍यांची नियुक्ती केली.

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. करोनामुळे मास्कला मागणी होती. सुरुवातीच्या काळात मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी सुती कपड्यांपासून मास्क तयार करण्यास सुरूवात केली.

यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील बचतगट सहभागी झाले. एका बचतगटात 10 ते 11 महिलांना समावेश असतो. चार बचतगट मिळून एक ग्रामसंघ तयार होतो. अशा प्रकारे जिल्ह्यात सुमारे 1 हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांना कामाचा चांगला मोबदला मिळाला असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे (मार्केटींग विभाग) जिल्हा व्यवस्थापक आजिनाथ आव्हाड यांनी सांगितले.

असा मिळाला रोजगार

महिला बचतगटांनी तयार केलेले मास्क जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका कार्यालय तसेच अन्य ठिकाणी स्टॉलवर विक्रीला ठेवण्यात आले. ग्रामपंचायत पातळीवर चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून मास्क खरेदी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. यासह काही बचत गटांनी थेट हॉस्पिटल, मोहटादेवी संस्था यासह अन्य सहकारी आणि खासगी संस्थांना मोठ्या प्रमाणात मास्कची विक्री केली. तीन स्तराच्या मास्कची किंमत 12 ते 15 रुपये आणि साध्या मास्कची किंमत 8 ते 9 रुपये होती.

बचत गटांची मास्कनिर्मिती

शेवगाव : 18 (33 हजार 450), पाथर्डी : 18 (65 हजार 700), कोपरगाव : 10 (66 हजार 500), नगर : 8 (26 हजार 800, राहाता : 8 (33 हजार 500), पारनेर : 4 (22 हजार), जामखेड : 10 (29 हजार 750), श्रीरामपूर : 3 (33 हजार 200), संगमनेर : 12 (54 हजार ), श्रीगोंदे : 10 (38 हजार), कर्जत : 8 ( 32 हजार 500), अकोले : 5 (28 हजार 600).

आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील महिला बचत गटांना मास्क निर्मितीची संधी उपलब्ध झाली. एकीकडे लोकांचा रोजगार बंद झाला असला तरी बचत गटातील महिलांना व त्यांच्या कुटुंबांला चांगला आर्थिक हातभार लागला. बचत गटांनी तयार केलेले मास्क लोकांचे आरोग्य रक्षण करीत असल्याचे समाधान देखील मिळत आहे. करोना आपत्तीमध्ये काम करण्यासोबत रोजगार मिळाल्याचा आनंद आहे.

– कविता बारवे, तालुका अभियान व्यवस्थापक, कोपरगाव.

करोनामुळे मास्कचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महिला बचतगटांनी मास्कची निर्मिती केली. या मास्क निर्मितीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 114 बचतगटांनी 71 लाख 25 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. एकीकडे रोजगार जाण्याच्या भीतीने नैराश्य निर्माण झालेले असताना बचतगटांनी केलेले हे सकारात्मक काम कौतुकास्पद आहे.

– सुनील पठारे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा

- Advertisment -

ताज्या बातम्या