Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना

करोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग अधिनियम 1897 लागू केला आहे. या अधिनियमातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली असून संबंधित जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील कोव्हिड बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी विविध उपचारांसाठी आकारावयाच्या कमाल दराची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी उपचारासाठी खाटा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. खाजगी वाहने व रुग्णवाहिका अधिग्रहित करून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची कार्यपध्दतीही निश्चित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर कोव्हिडबाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क विहित दरापेक्षा अधिक नसल्याबाबतची तपासणी करणे तसेच नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येतो आहे काय, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना केली आहे.

राहाता तालुक्यासाठी गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संदीप बनसोडे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय राहाता, श्री. कोल्हे, सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, राहाता यांचा समावेश असलेल्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तालुक्यातील नागरिकांना करोना रुग्णांवरील उपचारासंदर्भात खाजगी हॉस्पिटलने दिलेली सुविधा, रुग्णालयाने आकारलेले देयक तसेच अन्य अडचणींसंदर्भात तक्रार असल्यास समर्थ शेवाळे अथवा डॉ. संदीप बनसोडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या