करोना रुग्णांच्या बिलातून 45 लाखांची अतिरिक्त वसुली

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील 19 खासगी हॉस्पिटलमधून करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांडून बिलाची आकारणी होते की नाही, याच्या तपासणी केली असता सोमवार (दि.14) अखेर 45 लाख 28 हजार रुपयांची जादा बिल आकारणी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत तपासणी समितीने आपला अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

नगर शहरात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 28 खासगी रुग्णालयांना परवानगी दिली होती. यातील 7 रुग्णालयांत अद्याप एकही करोना रुग्णावर उपचार केलेले नाहीत. तर दोन रुग्णालयांत उपचार केलेल्या रुग्णांची बिले हे एक लाखांच्या आतील आहेत.

दरम्यान खासगी हॉस्पिटलकडून राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कमा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सरकार ऑडिटर यांची पथके तयार करून रुग्णालयनिहाय करोना रुग्णांच्या बिलाची तपासणी मोहीम हाती घेतली.

यात सोमवारीअखेर तब्बल 45 लाख 28 हजार रुपये करोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून संबंधित खासगी हॉस्पिटलने उकळले असल्याचे समोर आले आहे. ही सर्व बिले एक लाख रुपयांच्या पुढील आहेत. नगर शहरातील खासगी हॉस्पिटल आतापर्यंत 2 हजार 552 रुग्णांनी खासगी रुग्णालयात करोनावरील उपचार घेतलेले आहेत.

यातील 1 हजार 995 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1 लाखांपेक्षा अधिक बिले आकरण्यात आलेल्या 287 बिलांची तपासणी पूर्ण झाली असून यात 150 बिलांत त्रुटी आढळली आहे. त्रुटीची अथवा जादा आकारणी झालेली रक्कम ही 45 लाख 28 हजार आहे.

नगर-मनमाड रोडवर सावेडी शिवारात असणार्‍या आणि करोना उपचाराची एकीही बिल सादर न करणार्‍या हॉटेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला नोटीस दिल्यानंतर त्यांनी तपासणी समितीला बिल सादर केले. मात्र, त्यातील एकही बिल पूर्ण नसल्याने सर्व बिले परत करण्यात आली आहेत.

जादा बिल आकारणी करणार्‍या खासगी रुग्णालयांत 10 लाख 26 हजार रुपयांची सर्वाधिक बिल आकारणी ही शहरातील सर्वात बड्या हॉस्पिटलने केलेली आहे. त्या खालोखाल 8 लाख ते 2 लाखांपर्यंत 6 हॉस्पिटलने जादा बिल आकरणी केलेली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *