धक्कादायक : नाशकात आढळला युरोप व दुबईमधील करोनाचा नवा ‘स्ट्रेन’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

देशात परतलेल्या अनिवासी भारतीय व विद्यार्थ्यांंना युरोप मध्ये झालेल्या सुपर स्पेडर करोना विषाणुच्या नवीन स्ट्रेनचा दोन महिन्यापुर्वी उलगडा झालेला असतांना हाच युरोप स्ट्रेन आता नाशिक शहरात आढळून आला आहे. राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्थेला पाठविलेल्या काही अलिकडच्या काही नमुन्यातून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता नाशिक महापालिका संपुर्ण यंत्रणा हा सुपर स्प्रेडर करोना संसर्ग रोकण्यासाठी कामाला लागली आहे…

नाशिक शहरात गेल्या दोन आंठवंड्यात करोना रुग्ण प्रति दिन 200 वरुन 714 वाढत गेल्यानंतर आणि आता हा आकडा 900 ते 1000 इतका झाला आहे. करोना रुग्ण अति वेगात वाढत असल्यामुळे नाशिक महापालिकेकडुन काही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्थेला पाठविण्यात आले होते.

या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असुन यात करोनाचा सुपर स्प्रेड असलेल्या नवीन स्ट्रेन युरोप व दुबईतून आल्याचे समोर आले असल्याची माहिती मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

हा नवीन स्ट्रेन अतिशय वेगाने पसरत असल्याने आता महापालिकेकडुन तातडीने शहरातील भाजी विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी 30 पथकांद्वारे काम सुरु करण्यात आले आहे.

तसेच मनपा व शहर पोलीस यांच्यां संयुक्त पथकांकडुन आता मास्क न वापरणारे व होम कोरंटाईन असतांना बाहेर फिरणार्‍यांची तपासणी करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहे. अशाप्रकारे मनपा व शहर पोलीस यंत्रण हा नवीन स्ट्रेन रोकण्यासाठी कामाला लागली आहे.

युरोपात डिसेंबर – जानेवारी महिन्यात अति वेगात पसरणारा करोनाचा नवीन स्ट्रेन्थ आढळून आल्यानंतर या भागात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती. अचानक मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण वाढल्याने रुग्णालये भरुन गेली होती.

यावेळी अनेक अनिवासी भारतीय, विद्यार्थी व सहलीसाठी गेलेली मंडळी तात्काळ देशात परतली होती. यानंतर युरोपकडुन येणारी विमाने रद्द करण्यात आल्यानंतर देशात परतणार्‍या प्रवाश्यांना कोरंटाईनची सक्ती करण्यात आली होती.

या दरम्यान देशात मोठ्या प्रमाणात नागरिक परतल्यानंतर दिल्लीसह काही भागात करोनाचा युरोपातील नवीन स्ट्रेन आल्याचे स्पष्ट झाले होते. या दरम्यान शहरातील गंगापूररोड भागातील एक विद्यार्थी परतल्यानंतर त्याला करोना झाल्याचे समोर आले होते.

यानंतर पंचवटी विभागात परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीस व त्यांच्या कुटुंबातील काही जणांना करोना झाल्याचे समोर आले होते. मात्र या रुग्णांच्या तपासणीत त्यावेळी करोनाचा नवीन स्ट्रेन नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले होते. या रुग्णानंतर अनेक जण युरोपातून शहरात आले. मात्र हा नवीन स्ट्रेन नेमका कोणापासुन शहरात पसरला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.

मनपासाठी 1 लाख अँटीजेन चाचणी किट

नाशिक शहरात करोनाचा नवीन स्ट्रेन हा सुपर स्पप्रेडर असल्याने यास अटकाव करण्यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. तातडीने संशयितांची चाचण्या करण्यासाठी शासनाकडुन 50 हजार रॅपिड अँटीजेन चाचणी कीट व मनपाकडुन 50 हजार अँटीजेन किट खरेदी अशा प्रकारे 1 लाख अँटीजेन किट मागविण्यात आल्या असुन लवकरच त्या महापालिकेला मिळणार आहे.

तसेच मागील वर्षात जुन ते ऑगस्ट दरम्यान रुग्णालये, कोविड केअर सेंटर व हेल्थ सेंटर याकरिता मानधनावर घेतलेले व अलिकडे कमी केलेले एकुण 500 च्यावर कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यात आले असुन ही प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *