कोरोना संकट टळल्याच्या भ्रमात राहू नका – मुख्यमंत्री

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

मुंबई – राज्यातील कोरोना संकट टळल्याच्या भ्रमात राहू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याचा अर्थ लॉकडाऊन संपला आणि कोरोनाचे संकट टळले असा होत नाही. लॉकडाऊन कायम असून कोरोनाचं संकट टळले आहे या भ्रमातही राहू नका असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील जनतेशी फेसबुकवर संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या 36 तासांत राज्यात 835 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचं सांगितलं. राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांना लॉकडाऊनमधून थोडी सूट दिली आहे. त्यांनाही काही अटी घातल्या आहेत. राज्याचं रुतलेलं अर्थचक्र गतीमान करण्यासाठी आपण हळूहळू काम सुरू करत आहोत. गणपती बाप्पा मोरया म्हणून ही सुरुवात करत आहोत. ही केवळ ट्रायल आहे. आपण यावेळी कसं वागतो. त्याची ही चाचणी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊनमधून काही ठिकाणी थोडी शिथिलता दिल्यानंतर काही ठिकाणी लॉकडाऊन नसल्यासारखी गर्दी जमल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मला हे अजिबात चालणार नाही. ही थोडीशी शिथिलता आहे. याचा अर्थ लॉकडाऊन काढून टाकला असं नाही. लॉकडाऊन 3 मेपर्यंत राहणार आहे आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेच पाहिजे. शिथिलता म्हणजे बंधमुक्तता नाही. संकट टळलंय या भ्रमात राहू नका. लॉकडाऊन संपलेला नाही. तुम्ही लॉकडाऊन पाळला नाही तर अधिक घट्ट निर्बंध लागू करावे लागतील, असं सांगतानाच आपण जेवढी शिस्त पाळू, तेवढं या संकटातून लवकर बाहेर पडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *