Friday, April 26, 2024
Homeनगरमजुरी काम करणारे तरुण झाले चोरटे

मजुरी काम करणारे तरुण झाले चोरटे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लॉकडाऊनमुळे मजुरी काम करणार्‍या तरुणांच्या हाताला काम राहिले नसल्याने त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारला. सावेडी उपनगरातील एका बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान तीन चोरट्यांनी फोडले, याची माहिती मजुरी काम करून पोट भरणार्‍या काही तरुणांना लागली. त्यांनी या दुकानातील मिळेल तशी वस्तू चोरी करून बाजारात विक्री केली. 15 दिवस हे तरुण रात्रीच्या वेळी दुकानात चोरी करत होते. स्थानिक गुन्हे शाखेसह तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून यात 12 आरोपींना अटक केली. चोरी गेलेला 27 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

- Advertisement -

अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांचे सावेडी उपनगरात महावीर सिरॅमिक्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे. करोना लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून दुकान बंद आहे. लॉकडाऊन असल्याने मुथ्या यांनी दुकान उघडले नव्हते. याचा फायदा नगरमध्ये घरफोड्या करणार्‍या तिघांनी घेतला. परम्या गायकवाड, लक्ष्मण भीमराव कुर्‍हाडे, आकाश मच्छिंद्र कुर्‍हाडे यांनी या दुकानाच्या मागील बाजूची खिडकी फोडली. याची माहिती चोरट्यांनी प्रेमदान हाडको व परिसरातील मजुरी काम करणार्‍या तरुणांना दिली. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार गेल्याने ते घरी बसून होते.

हातात पैसा नसल्याने या तरुणांंनी चोरीचा मार्ग निवडला. दररोज रात्री त्या दुकानातील फोडलेल्या खिडकीतून आत प्रवेश करायचा व मिळेल ती वस्तू चोरी करून बाजारात कमी भावात विक्री करायची असा त्यांचा उद्योग 15 दिवस सुरू होता. या काळात दुकानातील सहा लाख 48 हजार 800 रुपये किमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान चोरट्याने चोरून नेले होते. एक दिवस मुथ्या यांनी दुकान उघडल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, समाधान सोळुंके यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या