करोना अंत्यविधीसाठी 24 तास राबतात ‘त्यांचे’ हात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वर्षभरापूर्वी करोनाच्या पहिल्या लाटेन अवघे जग घाबरून गेले होते. मात्र, आता करोनाच्या दुसर्‍या लाटेतील हाहा:कार सर्वत्र पहायला मिळत आहे. करोना रूग्णसंख्येत वाढ होत तर आहेच पण रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक परिचित चेहरे अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे कळल्यानंतर मन सुन्न होत आहे.

या हतबल परस्थितीत काही हात असेही आहेत जे न थकता अहोरात्र 24 तास सेवा देत आहेत आणि तिही स्मशानभूमीत करोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची. नगरच्या नालेगाव अमरधाममध्ये रोज 40 ते 50 मृत करोना रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जात असून यासाठी मागील दोन ते अडीच महिन्यांपासून 8 ते 10 कर्मचारी 24 तास अंत्यविधी करत आहेत.

नालेगाव अमरधाम स्मशानभूमी सध्या 24 तास धगधगत आहे. शववाहिका, रूग्णवाहिकेचा सायरन वाजत ये-जा, लाकडे-गोवर्‍या आणणारे ट्रॅक्टर, मोजक्या नातेवाईकांच्या हुंदक्यांनी काळीज चिरणारे दृश्य मन सुन्न करत आहे. अशा या परिस्थितीत 8 ते 10 तरुणांचे चिता रचण्यापासून त्यावर मृतदेह ठेवून शक्य तेवढे धार्मिक विधी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या फेब्रुवारीपासून दररोज हे दृश्य पाहयला मिळत आहे.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याठिकाणी आलेले मोजके नातेवाईक जडपावलाणे घरी परतत आहेत. मात्र, या तरुणांचे हात अखंडपणे कार्यातर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दररोज अंत्यविधीचे चक्र सुरू आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधी प्रशासकीय व्यवस्थेमार्फत केला जातो. सुरूवातीला फक्त नालेगाव अमरधाममध्ये करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते.

नालेगाव अमरधामवर आलेला ताण पाहता आता सावेडी कचरा डेपोच्या जागेसह केडगाव, नागापूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार होत आहे. गेल्या वर्षांपासून व आता अलीकडे दुसर्‍या लाटेत अडीच महिन्यांपासून 8 ते 10 कर्मचारी 24 तास करोना फैलाव होण्याची भिती असतानाही सेवा देत आहे.

मनपाकडून अमरधाममध्ये शहरासह जिल्ह्यातील करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यासाठी जे कामगार काम करतात ते अत्यंत प्रामाणिक व सचोटीने काम करत आहे. वेळेमध्ये सर्व अंत्यविधी पार पाडण्याचे काम हे कामगार करत असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

– शंकर गोरे (आयुक्त, मनपा)

करोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पहिले नालेगाव अमरधाममध्ये दररोज 5 ते 6 अंत्यविधी होत असे. परंतू, गेल्या फेब्रुवारीपासून दररोज 40 ते 45 अंत्यविधी होत आहे. त्यातील 20 अंत्यविधी विद्युत दाहिनीवर केले जातात. उर्वरित अंत्यविधी सरण रचून होत आहे. यासाठी 8 ते 10 कर्मचारी असून जिल्हा रूग्णालयातून शववाहिनीत मृतदेह आणणे, खाजगी रूग्णालयातून आलेले मृतदेह खाली उतरविणे व त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी आमचे कर्मचारी काम करत आहे. काही रूग्णांचे नातेवाईक अंत्यविधीसाठी नसतात. तेव्हा आमचे लोक धार्मिक विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

– स्वप्नील कुर्‍हे (व्यवस्थापक, नालेगाव अमरधाम)

जिल्ह्यातील मृत करोना रूग्णांवर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यविधी केले जात आहे. स्वप्नील कुर्‍हे व इतर कामगार प्रामाणिकपणे काम करत आहे. सकाळी आठपासून रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचे काम सुरूच असते. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे. मनपातर्फे त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात.

– डॉ. अनिल बोरगे (आरोग्य अधिकारी, मनपा)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *