मालेगाव : शाळेतील करोना उपचार केंद्रांचे स्थलांतर

jalgaon-digital
2 Min Read

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे दृष्टीकोनातून शाळा-महाविद्यालयात सुरू असलेले करोना उपचार केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी संस्था चालकांतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील उपचार केंद्र बंद करण्यात येऊन बाधीत रूग्णांवर मनपाने सुसज्ज केलेल्या सहारा रूग्णालयात उपचार केले जातील, अशी माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

शहरात करोनाच्या उद्रेकामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील मसगा महाविद्यालय, केबीएच विद्यालय, लोकमान्य हायस्कुल, ए.टी.टी. व जे.ए.टी. हायस्कुल, मालेगाव हायस्कुल आदी शाळा-विद्यालयांमध्ये करोना उपचार केंद्र तसेच क्वॉरंटाईन सेंटर मनपातर्फे सुरू करण्यात आले होते. मसगा महाविद्यालयात तर बाधीत रूग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रशस्त मैदानामुळे मोकळे वातावरण, इतर सुविधां तसेच डॉक्टर, सेवकांच्या उपलब्धतेमुळे मसगा केंद्र बाधीत रूग्णांच्या पसंतीचे ठरले होते.

ऑगस्ट महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शालेय सज्जता करण्याच्या दृष्टीकोनातून व इतर शैक्षणिक कामे सुरू करण्यासाठी शाळा-महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी करोना उपचार केंद्र असल्याने शिक्षकांबरोबर विद्यार्थी देखील शाळेत येण्यास धजावत नाही. त्यामुळे शैक्षणिक कामे जवळपास ठप्प झाली आहेत. शहरात करोना बाधितांची संख्या कमी झाली आहे व मनपाने अधिग्रहीत केलेल्या रूग्णालयांमध्ये उपचार होवू शकतात. त्यामुळे शाळा-विद्यालयातून करोना केंद्र हलवावे, अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे.

या संदर्भात माहिती देतांना उपायुक्त कापडणीस यांनी शाळा-महाविद्यालयातील करोना उपचार केंद्र बंद करण्यात येवून बाधीत रूग्णांवर सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहे. याठिकाणी जवळपास २१० ते २३० खाटांसह इतर सज्जता करण्यात आली आहे. बाधीत तसेच संशयित रूग्णांवर या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांतर्फे उपचार केले जातात. तसेच मन्सुरामध्ये देखील बाधीत रूग्णांवर आवश्यकता पडल्यास उपचार करण्याची सुविधा मनपा प्रशासनाने करून ठेवली असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *