Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रCorona : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फाेर्स

Corona : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फाेर्स

पुणे

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल, करोनावर अद्याप कुठलेही ठोस औषध अथवा लस उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून करोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. करोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील करोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधीच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविड १९ चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन -९५ मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल.

पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा. झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.

सर्व महापालिका आणि वैद्यकीय पथकाची समस्या सोडवू, लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करणं सध्या आपल्याकडे अवघड आहे. यासाठी हॉटेल उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, आवश्यक असलेले औषध मार्गदर्शक सूचनांनुसार मिळेल” अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी भाजपच्या वतीने “आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही” असा आक्षेप घेतला. केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या