Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘मिशन बिगिन अगेन'ची भुमिका तळागाळापर्यंत पोहचवा : ना. भुजबळ

‘मिशन बिगिन अगेन’ची भुमिका तळागाळापर्यंत पोहचवा : ना. भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशासह राज्य आणि त्यापाठोपाठ जिल्हा आणि प्रत्येक गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सर्वत्र नागरिकांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ लोकांवर आली आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने आपल्या सर्वांची आहे. राज्य शासनाची मिशन बिगिन अगेनची भुमिका लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत पोहचवावी असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

शासकीय विश्राम गृहात शनिवारी (दि.११) जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिरीष कोतवाल, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सिमंतिनी कोकाटे, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, देशाची व राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजुक परिस्थितीतून जात असून दिवसेंदिवस उपजीविकेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केवळ अन्नधान्य पुरवठा करून पुरेसे होणार नाही नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सर्वांना उपाययोजनांसोबत त्यांच्या अंमलबजावणीसाठी निरंतर सक्रिय रहावे लागेल. करोनाशी लढताना केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वे पाळण्याची आवश्यकता आहे.खासदार, आमदार व पदाधिकार्‍यांनी या काळात नागरिकांना ही मार्गदर्शक तत्वे समजून सांगून परिस्थिती नियंत्रणात कशी राहील याची काळजी घ्यावी.

सायंकाळी ७ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. रुग्णांची तपासणी संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढणार आहे, मात्र त्यामुळे लवकरच यावर आपण नियंत्रण मिळवू शकणार आहोत.जिल्हा रुग्णालयात लवकरच टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येत आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत अतिरिक्त बेड व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या