Saturday, April 27, 2024
Homeनगरकंत्राटी कर्मचार्‍यांची कपात केलेली रक्कम फरकासह मिळावी

कंत्राटी कर्मचार्‍यांची कपात केलेली रक्कम फरकासह मिळावी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानमध्ये सुमारे अडीच हजार पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांना देण्यात येणार्‍या पगाराबाबत शासनाच्या समान काम समान वेतन परिपत्रकाची अंमलबजावणी करावी तसेच त्यांचे 40 टक्के वेतन कपात बंद करून यापूर्वी कपात केलेली रक्कम फरकासह मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन पत्र साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे यांना देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की संस्थानमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञ, वाहन चालक, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, लिपिक, तारतंत्री, सॉफ्टवेअर इंजिनियर कंत्राटी पद्धतीने काम करतात. हे सर्व कर्मचारी साईबाबा संस्थानमध्ये जबाबदारीने काम करतात. हे संस्थानच्या कायम कर्मचार्‍यांप्रमाणेच शैक्षणिक पात्रता धारक व उच्चशिक्षित आहे.

साईबाबा संस्थानने शासनाच्या समान काम समान वेतन परिपत्रकाची अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. संस्थानच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने समान काम समान वेतन तत्त्वावर कंत्राटी कर्मचार्‍यांना 40 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता व त्यानुसार वेतन मिळत होते मात्र अचानकपणे 40 टक्के वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

साईसंस्थानने अल्प वेतनात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन कपात केलेली असून पूर्वीपासून आर्थिक संकटात असलेल्या वर्गालाच पुन्हा आर्थिक संकटात ढकलले आहे. मात्र उच्च वेतनश्रेणी कर्मचारी वर्गाच्या वेतनाला कुठलाही धक्का लावलेला नाही मग वेतन कपातीबाबत फक्त कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, रा.यु.काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते, मा. जिल्हा अध्यक्ष अमित शेळके आदी पदाधिकारी उपस्थित तसेच सह्याद्री निवेदन पत्र देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या