Friday, April 26, 2024
Homeनगरमुसळवाडी तलावातून दूषित पाणीपुरवठा

मुसळवाडी तलावातून दूषित पाणीपुरवठा

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाया मुसळवाडी तलावातील पाणी दूषित झाले असून त्यामुळे टाकळीमियाँ, मुसळवाडीसह ९ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशी माहिती पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता निमसे यांनी दिली.

- Advertisement -

२० हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीमिया गावात शासनाने ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली असून ही योजना पूर्णत अयशस्वी झाली आहे. यामुळे शासनाचे १० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा संपूर्ण गावाला पिवळे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने टाकळीमियाच्या ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने लक्ष घालावे, अशी मागणी सौ. सुनीता निमसे व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

ही योजना टाकळीमिया ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्यानंतर आजअखेर सहा महिने झाले तरी या गावाला संपूर्ण दूषित पाणीपुरवठा होत आहे. आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत पाठविलेले पाण्याचे नमुने शुद्ध असल्याचा अहवाल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे लवकरच या योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच विश्वनाथ निकम, सदस्य सुरेश भानुदास करपे, अकबर सय्यद, अण्णासाहेब सगळगिळे, बाळासाहेब माने, जनार्दन गोसावी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

मुसळवाडी तलावातून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी टाकळीमिया पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रात येते. येणारे पाणी हे अतिशय दूषित आहे. याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना माहिती दिल्यावर त्यांनी मुसळवाडी तलावात तातडीने भंडारदरा धरणातून ५० क्युसेसने पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने मुसळवाडीसह ९ गावाच्या पाण्याची योजना जर खराब होती तर मग टाकळीमिया गावाची पाणी योजनेस कोट्यवधी रुपये खर्च करून शासनास का खड्ड्यात घातले? असा आरोप सुरेश निमसे यांनी केला आहे.

यावेळी निमसे यांनी मुसळवाडी तलावात आजूबाजूचे नागरिक प्रातर्विधीसाठी तलावानजिक जातात. तसेच जनावरे धुण्यासाठी तलावात जात असल्याने तेथील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे मुसळवाडी तलावास तात्काळ संपूर्ण संरक्षक भिंत बांधून तलावातील जलपर्णी काढून मिळावी व तलावातील गाळ काढणे अंत्यत गरजेचे आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी श्रीरामपूर मतदारसंघाला जोडलेल्या पण राहुरी तालुक्यातील असलेल्या ३२ गावांकडे लक्ष देण्याची मागणी वेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या