पिण्याचे पाणी दूषित होण्याची टक्केवारी पाच टक्क्यांपेक्षा जास्त

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याचेच समोर येत आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालवधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घेतलेल्या एकूण पाणी नमुन्यांपैकी 5.15 टक्के नमुने हे दुषित आढळून आले आहे. ही बाब ग्रामीण भागातील जनतेसाठी धोक्याची असून वारंवार पाणी नमुने दुषित येणार्‍या ग्रामपंचायतींवर आता कारवाई करण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमतिपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रत्येक महिन्यांच्या तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून येते. तपासणीनंतर संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत, तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. ऐन पावसाळ्यात जून महिन्यांत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांतील 2 हजार 459 पाणी नमुने तपासण्यात आले.

यापैकी 132 नमुने दूषित आढळून आले होते. त्यानंतर जुलै महिन्यांत 60 पाणी नमुने दुषित आढळून आलेले आहे. दरम्यान पाणी नमुने दुषित आढळणार्‍या ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभाग सातत्याने देत आहेत. मात्र, त्यात सुधारणा होतांना दिसत नाही. पूर्वी सातत्याने पाणी नमुने दुषित येणार्‍या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद पातळीवरून कारवाई करण्यात येत होती. मात्र, अलिकडच्या काही वर्षात पाणी नमुने वारंवार दुषित येणार्‍या ग्रामपंचायतींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

16 ब्लिचिंग पावडरचे नमुने निकृष्ट

जिल्हा परिषद ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसोबत संबंधीत ग्रामपंचायती पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या ब्लिचिंग पावडर देखील तपासात असते. मागील महिन्यांत अशा प्रकारे 281 पावडरचे नमुने तपासण्यात आले. पैकी 16 नमुने निकृष्ठ असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक निकृष्ट पावडर जामखेड तालुक्यात 12 ठिकाणी तर कर्जत आणि शेवगावमध्ये प्रत्येकी 2 नमुने दुषित आहे. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान 63 पावडरचे नमुने दुषित आढळलेले आहेत.

पाच महिन्यांतील दुषित पाणी नमुने

नगर 45, अकोले 31, जामखेड 10, कर्जत 60, कोपरगाव 17, नेवासा 5, पारनेर 52, पाथर्डी 35, शेवगाव 14, राहाता 9, राहुरी 62, संगमनेर 11, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 5 असे एकूण 321.

जुलै महिन्यांतील दुषित पाणी असणारी गावे

नगर-राळेगण म्हसोबा, देऊळगाव, उदरमल, मांडवे, टाकळी काझी. अकोले-सातेवाडी, अंम्बवगण, हिवरगव, चिंचवणे, रेडे, धामणगाव आवारी, तांभोळ. जामखेड- आनंदवाडी, पिंपळगाव.कर्जत- घुमरी. कोपरगाव- कुंभारी, तळेगाव मळी. पारनेर-काताळवेढे, पळसपूर, डोंगरवाडी, दैठणे गुंजाळ, म्हसोबा झाप, देसवडे. पाथर्डी- धामणगाव, मोहजदेवढे, खरवंडी. शेवगाव- कर्‍हे टाकळी, भायगाव, सुलतानपूर बु. राहाता- यलमवाडी, कोर्‍हाळे, ममदापूर, निमगाव कोर्‍हाळे. राहुरी- केंदळ बु, करजगाव, गायकरवाडी, कात्रड, उंबरे, तांभेरे, तांदूळनेर. संगमनेर- राजापूर, शिरसगाव, धुपे. श्रीगोंदा- कोशेगव्हावण, टाकळी लोणार, हिरडगाव.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *