Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकश्रमिकनगर येथील मनपा शाळेचे बांधकाम पूर्ण

श्रमिकनगर येथील मनपा शाळेचे बांधकाम पूर्ण

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

सातपूरमधील प्रभाग 9 मध्ये श्रमिकनगरमधील कार्बन नाकाजवळ नाशिक महापालिकेच्या वतीने माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल चार एकर जागेवर मनपाच्या भव्य शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच लोकार्पण केले जाणार आहे.

- Advertisement -

शिवाजीनगर-श्रमिकनगर भागात नवीन शाळेसाठी दिनकर पाटील यांनी 1993 पासून पिंपळगाव शिवार, श्रमिकनगरमध्ये शाळेच्या राखीव भूखंडावर शाळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. नाशिक शहरातील एकूण मनपाच्या सर्व शाळांमध्ये 24 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तब्बल 2 हजार 400 विद्यार्थी शिवाजीनगर-श्रमिकनगरमधील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

नवीन शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मनपाच्या चार एकर जागेवर एक एकर भागात शाळेची इमारत तर उर्वरित जागा विद्यार्थांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होणार आहे. चार एकर जमिनीसाठी आठ कोटी व बांधकामासाठी एकूण आठ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

तसेच शाळेच्या पहिल्या मजल्याच्या कामासदेखील मंजुरी मिळाली असून पहिल्या मजल्यासाठी चार कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला असून त्याचे बांधकामदेखील लवकरच सुरू होणार आहे. शाळेला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

या शाळेला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असे नामकरण करण्यात आले असून याबाबत ठरावदेखील मंजूर झाला आहे.

शिवाजीनगरमधील मनपा शाळा क्र. 21 व 22 मधील इयत्ता 1 ली ते 7 वीचे विद्यार्थी तसेच इयत्ता 8 वी ते 10 वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी असे एकूण 1 हजार 500 विद्यार्थी सदर नवीन शाळेत शिक्षण घेणार आहेत. तर शिवाजीनगरमधील मनपा जुन्या शाळेत इयत्ता 1 ली 7 वीपर्यंत केवळ मुलींची शाळा चालवली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या