चिंता इ-वाहनांच्या सुरक्षिततेची

jalgaon-digital
6 Min Read

अनेक देशांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याच्या बातम्या वारंवार ऐकायला मिळणे चिंताजनक आहे. भारतीय हवामानात, उष्ण तापमानात टिकतील अशी इ-वाहने असायला हवीत. त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न निर्माण झाल्यास नागरिक ती घेण्यास धजावणार नाहीत.

देशभरात इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये आग लागण्याच्या बातम्या वारंवार येऊ लागल्या असून हे अत्यंत चिंताजनक आहे. इ-वाहनांमध्ये आग लागल्यामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. अलीकडेच तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये इ-स्कूटर चार्जिंग सुरू असताना वडील आणि लेकीचा मृत्यू झाला. त्यांनी नुकतीच नवीन इ-स्कूटर घेतली होती आणि घराबाहेर चार्जिंगची सुविधा नसल्यामुळे त्यांनी ती बेडरूममध्ये चार्जिंगसाठी लावली होती. बॅटरीचा स्फोट होण्याचे कारण तिची क्षमता कमी असणे हे आहे, असे सांगितले जाते. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्येही इ-स्कूटरला आग लागल्याची घटना घडली आहे. 21 वर्षीय गणेश कार्यालयातून इ-स्कूटरवरून घरी परतत असताना त्याच्या वाहनातून धूर निघत असल्याचे त्याला दिसले. त्याने ताबडतोब वाहन थांबवले आणि पाहता-पाहता स्कूटर जळू लागली. त्रिचीमध्येही अशीच घटना घडली. पुण्यातही इ-स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच इलेक्ट्रिक वाहनांना गुणवत्ताविषयक मार्गदर्शक नियमावलीही लवकरच जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्याच्या इंधन महागाईच्या काळात हा मोठा झटका मानला जात असून पर्यायी इंधनाच्या वाटचालीलासुद्धा तो मोठा धक्का मानला जातो. भूगर्भातून निघणार्‍या कच्च्या तेलाच्या मदतीने पेट्रोल-डिझेलची निर्मिती केली जाते. जगभरातील बहुतांश वाहने याच इंधनावर अवलंबून आहेत. तथापि पृथ्वीच्या पोटातील इंधनाचे साठे लवकरच संपणार आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे विकासाची घोडदौड कायम ठेवायची असेल तर पर्यायी इंधनाचा वापर करून चालणारी वाहने हाच उत्तम पर्याय आहे. पेट्रोल-डिझेल मिळणे काही वर्षांनंतर बंद होईल, हे गृहीत धरून अनेक देशांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. इ-वाहनांचा दुसरा फायदा म्हणजे प्रदूषणापासून मुक्तता. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनही इलेक्ट्रिक वाहनांना महत्त्व दिले जात आहे. भारताच्या अनेक राज्यांमधील सरकारे तर अशा वाहनांसाठी अनुदानही देतात.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित या नव्या समस्येने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांना इ-स्कूटर खरेदी करायच्या आहेत. परंतु अशा वेळीच इ-स्कूटरबद्दल मनात शंका निर्माण होणे दुर्दैवी असून इ-वाहनांच्या पुढील प्रवासाच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. वाहनांना आग लागण्याच्या सर्वाधिक दुर्घटना वाहनाचे चार्जिंग सुरू असताना घडल्या आहेत. स्कूटरमध्ये वापरली जाणारी बॅटरी ही केवळ एकच बॅटरी नसते. वास्तविक तो शेकडो बॅटर्‍यांचा संच असतो. या शेकडो बॅटर्‍या एकत्रितपणे पॅक केलेल्या असतात. त्यामुळेच त्याला ‘बॅटरी पॅक’ असे म्हटले जाते. जो बॅटरी पॅक इ-स्कूटरमध्ये वापरला जातो तो पॅक भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांसाठी योग्य आहे की नाही, हा मुख्य मुद्दा आहे. इ-स्कूटर पेटण्याच्या अनेक घटना उन्हाळ्यातच घडल्या आहेत, हे महत्त्वाचे असून यंदाचा उन्हाळा तीव्र आहे, हेही सर्वजण जाणतात. लिथियमची बॅटरी थंड हवामानात चांगले काम करते, असे सामान्यतः म्हटले जाते. त्याचप्रमाणे उच्च तापमान असणार्‍या भागांमध्ये काम करताना लिथियम बॅटरी पॅक गरम होऊ शकतो, असे सांगितले जाते. जाणकार असेही सांगतात की, लिथियम आयन बॅटरीमध्ये आग लागलीच तर त्यावर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड असते. कारण ही बॅटरी अत्यंत वेगाने तसेच उच्च तापमानासह जळते. यावरून असाही एक प्रश्न निर्माण होतो की, भारतात वापरण्यात येणारे बॅटरी पॅक भारतातील जलवायू परिस्थितीशी अनुकूल नाहीत का?

इ-वाहने ही आजच्या काळाची गरज आहेे. परंतु ही वाहने व्यवस्थित चाचण्या घेऊन, भारतीय हवामानासाठी ती योग्य आहेत याची खातरजमा करून बाजारात उतरवली गेली पाहिजेत, हेही तितकेच खरे. त्याचप्रमाणे या वाहनांचे चार्जिंग करताना कोणकोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे याबाबत स्पष्ट निर्देश जारी करण्याची गरज आहे आणि वाहनधारकांनीही त्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेही आवश्यक आहे. वाहनाचा वापर केल्यानंतर लगेच ते चार्जिंगला लावू नये, असे तज्ज्ञ लोक सांगतात. मुद्दा हाच की या गोष्टी इ-वाहने बाजारात येण्यापूर्वी सांगितल्या का गेल्या नाहीत?

इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागण्याच्या घटना खरोखर चिंताजनक आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच वाहने अधिक सुरक्षित करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी हा एकमेव सुटा भाग असा आहे जिथे आग लागू शकते. त्यामुळे बॅटरीच अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक देशातील हवामान विचारात घेऊन या बॅटरीची निर्मिती व्हायला हवी.

इ-स्कूटरची काळजी कशी घ्यायची हे खूप महत्त्वाचे असून त्यामध्ये ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अमेरिकेत जेव्हा अशा घटना वारंवार समोर येऊ लागल्या होत्या तेव्हा तिथे त्यांची चौकशी करण्यात आली होती हे उल्लेखनीय आहे. या तपासणीत असे दिसून आले होते की, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो आणि ही बॅटरी उच्च तापमान सहन करू शकत नाही. ही बॅटरी अधिक गरम झाल्यास लगेच पेट घेते. याखेरीज आगीच्या घटनांमागे कंपन (व्हायब्रेशन) हेही एक कारण असावे, असेही मानले गेले. वाहन चालवत असताना बॅटरी अधिक व्हायब्रेट झाल्यासही वाहनाला आग लागू शकते, असे सांगण्यात आले. हे खरे असल्यास भारतीय रस्ते आणि वाहतुकीची परिस्थिती याचा विचार करता बॅटरीत बरेच बदल करावे लागतील. याखेरीज उत्पादन सदोष असेल तरीही अशा घटना घडू शकतात, असेही अमेरिकेतील तपासणीत दिसून आले होते. तसे असल्यास इ-वाहनांना परवानगी देताना अशा घटना घडल्यास जबाबदारी कुणाची हे निश्चित करावे लागेल आणि त्यासंबंधी नियमही तयार करावे लागतील.

भारतातील नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 10 लाख 76 हजार 420 एवढी आहे. मात्र चार्जिंग स्टेशन्सची संख्या केवळ 1 हजार 742 एवढीच आहे. एका अंदाजानुसार 2026 पर्यंत भारताला चार लाख चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता असेल आणि 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा उद्योग 150 अब्ज डॉलर्स म्हजेच साडेअकरा लाख कोटी रुपयांचा असेल, असेही सांगितले जाते. या बाजाराच्या आकाराची चर्चा जेवढी झाली तेवढी वाहनचालकांच्या सुरक्षिततेची झाली नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे अनेक फायदे आहेत. आज आपण सगळेच विषारी धुरामुळे हैराण झालो आहोत आणि त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे महागाईनेही आपण त्रस्त आहोत. या परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहन चालवणे चांगलेच, तथापि ते सुरक्षित असल्याची हमी मिळायला हवी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *