Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगपरिपूर्ती

परिपूर्ती

घराघरातील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर

आई नोकरी करणारी असेल तर सासूबाई बाळाला दिवसभर प्रेमाने जपतात. ते बाळ त्यांच्या घरातील सर्वस्व नि घरादारातील आनंद असते. बाळाच्या झोळीला आजोबाही झोका देतात. बाळालाही आई-वडिलांबरोबर घरातील सर्वांचाच लळा लागतो. सुनेचेही नोकरीत लक्ष लागते नि घरातील आनंद द्विगुणीत होतो. दिवसभर बाळाला खाऊपिऊ घालणारी आजी बाळाचे बाळसे पाहून हरखून जाते. स्वतःचे काही दुखत असेल तर तेही सांभाळून ती घर सावरत राहते व सुनेला मुलीची माया देते. सून नोकरीवरून घरी आली की बाळाला कुशीत घेऊन ती धन्य होते नि मनोमनी आपल्या सासूबाईंचे आभारही मानते. एकमेकींच्या हातभाराने घरात चांदणे नक्कीच फुलते.

बाळ रांगू लागते नि घरभर हळूहळू फिरू लागते. गुडघ्याला माती लागते, पडते पण परत उठते नि प्रयत्न करू लागते. घरात कशाचा कोपरा लागला तर रडूही लागते. पण यातूनच बाळ एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करायला शिकते. त्याच्या बालमनाला समजू लागते की आपण काही करू लागलो तर आपल्याला येऊ लागते. हळूच बाळ चालू लागते नि अंगणातही येते चिऊ काऊला भेटायला. अंगणातील मातीत माखून फुलांपर्यंतही जाऊ पाहते. असे हे बाळ आता बोबडे बोल बोलू लागते व प्रथम बोलते आई. आई हे त्याचे शब्द ऐकून सर्वच सुखावतात. आता तिची ओळख फक्त तिच्या नावाने न राहता बाळाची आई या नावाने होऊ लागते. तो आनंद काही वेगळाच असतो .

- Advertisement -

आम्हाला शाळेत परिपूर्ती नावाचा धडा होता. लेखिका इरावती कर्वे यांचा हा अप्रतिम लेख होता. धोंडो केशव कर्वे यांच्या इरावती या सूनबाई होत्या. घरदार सुसंस्कृत होते. एकदा इरावती बाईंना व्याख्यान देण्यासाठी कार्यक्रमात बोलावले होते. त्यांचा परिचय करून देणार्‍या बाई म्हणाल्या, या सुप्रसिद्ध महर्षी कर्वे यांच्या सूनबाई, सुप्रसिद्ध प्राध्यापक यांच्या पत्नी आहेत, स्वतः विद्याविभूषित आहेत, मी त्यांना आता भगिनींना चार शब्द सांगण्याची विनंती करते. पण इरावतींना ही ओळख अपूर्ण वाटली. दोन दिवसांनी त्या घराकडे येत होत्या. घराजवळ काही मुले होती.

अचानक त्या मुलांच्या घोळक्यातून त्यांना शब्द ऐकू आले अरे, पाहिलीस का? या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई आहे बरे का. इरावती बाईंना ते शब्द ऐकून एकदम समाधान मिळाले. भाषणाच्या वेळी बाईंनी सांगितलेली त्यांची ओळख मुलांनी पूर्ण केली होती. त्यांना ‘कर्व्याची आई’ असे म्हटले होते. आई या शब्दाने त्यांची खरी ओळख पूर्ण झाली होती म्हणून धड्याचे नाव होते ‘परिपूर्ती.’ वाचकहो, आई या शब्दाला किती मोठा अर्थ आहे पाहिले ना?

- Advertisment -

ताज्या बातम्या