संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्या : जाधव

jalgaon-digital
2 Min Read

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण ल.पा. प्रकल्पांतर्गत येणार्‍या भेगु धरण क्षेत्रातील पाटचारीसाठी संपादित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप शासनाने अदा केलेला नाही.

मोजक्या शेतकर्‍यांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला देण्यात आला आहे. सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना सरसकट नवीन दराप्रमाणे मोबदला द्या अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी प्रांताधिकारी विकास मिना यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील वीरशेत ता. कळवण येथील गुजरातकडे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यातील शेतकर्‍यांना या पाण्याचा लाभ व्हावा यासाठी माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी सन 2003 साली वीरशेत ग्रामपंचायत व मांगलीदर शिवारात भेगु धरण बांधले. या प्रकल्पामुळे या भागातील शेतकर्‍यांना पाण्याचा लाभ झाला आहे.

मात्र हे धरणाच्या पाटचारीसाठी काही ठिकाणी 16 मीटर तर काही ठिकाणी 35 मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच धरणाकडे जाण्यासाठी अनेक शेतकर्‍यांच्या शेतातून पक्का रस्ता तयार केलेला आहे. अनेक वर्ष होऊनही या शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. काही शेतकर्‍यांना तुटपुंजा स्वरूपात मोबदला देण्यात आलेला आहे.

या भागातील आदिवासी अडाणी जनतेची फसवणूक झाली असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने पाटचारी व रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचे फेरसर्वेक्षण करून येथील वंचित लाभार्थ्यांना तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी प्रांत अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *