Friday, April 26, 2024
Homeनगरजातीय तणावाच्या घटनांना आ. राणे कारणीभूत

जातीय तणावाच्या घटनांना आ. राणे कारणीभूत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात वाढत्या जातीय तणावाच्या घटनांना आ. नितेश राणे हेच कारणीभूत आहेत. आ. राणे यांनी महाराष्ट्रात जिथे जिथे भाषण केले, तेथे दंगली झाल्या. त्यांच्या भाषणाची क्लीप तपासल्यास याचा उलगडा होईल. त्यांनी नगर शहरात येऊन प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यानंतर जिल्ह्यात तणाव वाढला. शेवगाव येथील घटनेलाही तेच कारणीभूत आहेत, असा दावा करत आ. राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. त्यांना नगर जिल्हा बंदी करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

शिवसेना पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक ओला यांची काल (मंगळवारी) भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक गायकवाड, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय तणाव वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जातीय दंगली घडत आहेत.

नगर शहरात दंगल झाली. त्यानंतर 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी शेवगाव येथे दंगल झाली. वारंवार होणार्‍या घटनांमुळे सर्व सामान्य जनता दहशतीखाली आहे. व्यापारी, महिला भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी नगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांनी सभा घेतली व प्रक्षोभक भाषण केले. दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केले होते. तेव्हापासूनच नगर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जातीय तणावाच्या घटना वाढून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी व दुकानदार तणावाखाली आहेत.

शेवगाव येथील दंगल ही चिथावणी खोर भाषणामुळेच झाली आहे. या दंगलीचा सखोल चौकशी व्हावी व जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच तेथील व्यापारी वर्गाला संरक्षण मिळावे. आ. राणे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दंगली घडू शकतात. त्यामुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, राणे यांना नगर जिल्ह्यात बंदी करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर अंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या