Thursday, May 2, 2024
Homeनगरआगामी आठवड्यात सरपंच निवडीचा कार्यक्रम

आगामी आठवड्यात सरपंच निवडीचा कार्यक्रम

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

राज्यातील 28 हजार 875 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली. 18 जानेवारीला मतमोजणी झाली असून

- Advertisement -

तिथून पुढे 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवड होणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 705 निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती आणि 53 बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच निवड कार्यक्रमाची आखणी या आठवड्यात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यास दुजोरा दिला.

जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यात 53 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. तर 705 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यासह 9 ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी काही जागांसाठी एकही वैध अर्ज आले नाहीत. या ग्रामपंचायती वगळून जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींसाठी जिल्हा प्रशासन सरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेस पाठवणार आहे.

आधी आरक्षण असलेल्या जागांचे नोटीफिकेशन काढून त्यानंतर सरपंच निवडीचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसात हा कार्यक्रम तयार हाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘सार्वमत’शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर आणि सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांकडे त्या प्रवर्गातील सदस्य नाहीत, तसेच सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतरही विरोधी गटातील मागास प्रवर्गातील सदस्याला सरपंचपदी लॉटरी लागली, असेही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे, सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील दोन-चार सदस्य सत्ताधारी गटाकडे असल्याने सर्वात पहिले सरपंच कोण, असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अशात नाराज सदस्यांचा अचूक वेध घेऊन विरोधकांनी त्याला थेट सरपंचपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत नेमका कोण आणि कोणत्या गटाचा सरपंच होणार? हे निश्चित सांगणे कठीण झाले आहे. तर सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर सदस्य संख्या काठावर असलेल्या गटाने विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवत आपले सदस्य सहलीवर पाठवले आहेत.

पहिली ग्रामसभा…

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांत सरपंच निवड करणे बंधनकारक राहणार आहे. सरपंचपद आरक्षीत झालेल्या ठिकाणी नोटीफिकेशन काढण्यात येणार असून त्यानंतर नियोजनानुसार सरपंच निवडीची सभा; अर्ज भरणे, माघार आणि अंतिम निवड त्याच दिवशी होणार आहे. राज्यातील 14 हजार 234 पैकी बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड 8 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून सरपंच निवड झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपर्यंंत पहिली ग्रामसभा घेणे नूतन सरपंच व सदस्यांना असणार बंधनकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या