Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्र'या' तारखेपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरू

‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरू

मुंबई l Mumbai

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- Advertisement -

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरू होत असताना यूजीसीने देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास करोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.

यावेळी उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असायला हवी. यूजीसीने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालयं सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होतील. सध्या केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असली तरी ५ मार्चनंतर १०० टक्के सुरू करण्याचा विचार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. तसेच महाविद्यालये सुरू होणार असली तरी वसतिगृहे मात्र सध्या बंदच राहणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील वसतिगृहे की करोना संशयित रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे त्या वसतिगृहांना कोणत्याही प्रकारे धक्का लावता येणार नाही. म्हणूनच तूर्त वसतिगृहे बंद राहतील अशी माहिती सामंत यांनी दिली.

दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मागील दोन-तीन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर २०२० पासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर, महाविद्यालये व शिक्षणसंस्था सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी असल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या