Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिक्षेत; २५ टक्के अभ्यासक्रमाचे वेळापत्रकच नाही

महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिक्षेत; २५ टक्के अभ्यासक्रमाचे वेळापत्रकच नाही

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेच्या जवळपास ७५ अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र बीए, बीएससी यांसह इतर २५ टक्के अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे.

- Advertisement -

पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस क्वेश्चन-एसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे.

डिसेंबर-जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षांचे नियोजन करण्यात व एजन्सी निवडीतील मतभिन्नतेमुळे विद्यापीठाला विलंब लागल्याने त्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होत आहेत.

प्रथम सत्र परीक्षेसाठी सुमारे सहा लाख विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या दिवशी ८० विषयांची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. विद्यापीठाने २५ मार्च रोजी वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगितले होते.

तसा परिपत्रकात उल्लेख देखील करण्यात आला होता. परीक्षा अर्ज भरून घेण्याची तारीख लांबल्याने २५ मार्चला केवळ चार अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने गेल्या आठवड्यात भरात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, बीबीए, बीकॉम, सर्व डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एमसीए यांसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत.

मात्र अद्यापही सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या बीएससी, बीए, एमबीए अशा अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

परीक्षा अर्ज भरून घेण्यास विलंब झाल्याने व त्यांची अद्ययावत माहिती परीक्षा विभागाकडे येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे जवळपास २५ टक्के अभ्यासक्रमांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. लवकरच सर्व वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकतात.

परीक्षा ४५ दिवसात संपविण्याचे लक्ष

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा १० एप्रिलला सुरू होणार आहेत, त्यात काही सार्वजनिक सुट्ट्या असल्याने परीक्षा घेता येणार नाहीत. त्यामुळे रविवारी देखील परीक्षा घेण्यात येतील. या परीक्षेत जवळपास ४ हजार ५०० विषयांची परीक्षा ४५ दिवसात संपविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या