Thursday, April 25, 2024
Homeनगर‘त्या’ प्रकरणातील आरोपींचा अन्य मुलींसोबत संपर्क नाही - डीवायएसपी वाघचौरे

‘त्या’ प्रकरणातील आरोपींचा अन्य मुलींसोबत संपर्क नाही – डीवायएसपी वाघचौरे

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील खांडगाव परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या बिहार राज्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचा वेगात तपास सुरू असून या आरोपींचा तालुक्यातील अन्य मुलींसोबत संपर्क नाही, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी सोशल मिडियावरुन संपर्क ठेवत बिहार येथील एका तरुणाने शुक्रवारी संगमनेर येथे येवून या युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. हा प्रकार लव जिहादचा असल्याचा दावा होत असल्याने काल सकाळी डीवायएसपी वाघचौरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराची माहिती दिली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे पबजी गेम खेळत असताना दोन वर्षापुर्वी अक्रम शहाबुद्दीन शेख रा. अलीनगर जि. दरभंगा, बिहार याच्यासोबत ओळख झाली होती. दि. 16 जून रोजी अक्रम शेख हा त्याचा मित्र मोहमद नेमतुल्ला मोहमद कैसर (दोघे रा. इमामगंज, अलीनगर जिल्हा दरभंगा राज्य बिहार) याला सोबत घेऊन सदर मुलीस भेटण्यासाठी दीड हजार किलोमीटरचे अंतर कापून थेट बिहार राज्यातून संगमनेरला आला होता. दोघांची भेट शुक्रवारी दुपारी कासारवाडी रोड येथे झाली. यावेळी अक्रम शेख याने सदर युवतीस ‘तु माझे सोबत माझ्या गावाकडे बिहारला चल, तु मला खुप आवडतेस, आपण दोघे लग्न करु अशी गळ घातली. मी तुला मित्र या नात्याने भेटायला आली आहे. मी तुझ्या सोबत येणार नाही असे या मुलीने त्याला सांगितले.

बिहार ला जाण्यास नकार दिल्याने अक्रम शहाबुद्दीन शेख व त्याचा मित्र नेमतुल्ला यांनी बळजबरीने तिचा हात पकडुन बदनामीची धमकी दिली. घाबरलेल्या या मुलीने आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होवुन त्या तरुणांना पकडले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हे तरुण बिहार राज्यातून संगमनेर शहरात कोणाच्या मदतीने कसे आले नेमके कोणत्या कारणाकरीता आले, त्यांचा येथे येण्यामागचा नेमका हेतू काय होता. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, तसेच सध्या लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत असल्याने त्या दृष्टीने देखील आरोपींकडे कसून तपास करण्यात येत असल्याचे डीवायएसपी वाघचौरे यांनी यावेळी सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलची तपासणी केली असता अन्य मुलींसोबत त्यांचा संपर्क नसल्याचे स्पष्ट झाले. पकडण्यात आलेल्या आरोपींना कोणी पैसे पुरवले आहे का? याचाही तपास पोलीस करत असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. हा लव्ह जिहादचा प्रकार दिसत नसल्याचे प्राथमिक तपासावरून दिसते. आरोपींची आणखी सखोल चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या