Friday, April 26, 2024
Homeनगरग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक कायद्याचे महत्त्व अधिक

ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक कायद्याचे महत्त्व अधिक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्त्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी

- Advertisement -

काम करणार्‍या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला. ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष न्या. व्ही.एस. प्रेमचंदानी, न्यायिक अधिकारी चारू डोंगरे, कायदेविषयक अभ्यासक प्रज्ञा हेंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ग्राहकांच्या हितासाठी असणार्‍या कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच नव्या कायद्यात प्रशासनाला दिलेल्या अधिकारांचा वापर ग्राहकांच्या हितासाठी अधिकाधिक केला जाईल, यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनासोबतच ग्राहक चळवळीत काम करणार्‍या संस्थांची जबाबदारी अधिक आहे. न्या. प्रेमचंदानी यांनी नवीन कायद्यातील तरतुदी आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत त्याची अंमलबजावणी याबाबत सविस्तर विवेचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती माळी यांनी केले. यावेळी त्यांनी सादरीकरणाद्वारे कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या