Friday, April 26, 2024
Homeजळगावखबरदार... शहरात कचरा दिसता कामा नये !

खबरदार… शहरात कचरा दिसता कामा नये !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव यासह साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. साथीच्या आजरांना आळा घालण्यासाठी उद्या दि. 1 ऑगस्टपासून स्वच्छता संकल्पना देश हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

यामध्ये शहरातील सर्व भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात रस्त्यावर कचरा दिसल्यास तेथील संबंधित कर्मचार्‍यासह अधिकार्‍यांवर कारवाइ होणार अशी तंबी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अभिजीत राऊत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत अधिकार्‍यांना दिली.

जळगाव महापालिका राष्ट्रीय स्पर्धेता स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सहभागी आहे. या स्पर्धेतंर्गत स्वच्छता संकल्प देश ही योजना मनपाकडून राबविली जात असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अभिजीत राऊत यांनी शनिवारी महापालिकेच्या आरोग्य व दवाखाना विभागाची संयुक्तीक बैठक घेतली.

या बैठकीला उपायुक्त प्रशांत पाटील, श्याम गोसावी, संतोष वाहुळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरात स्वच्छतेसाठी वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिला आहे.

मात्र तरी देखील शहरातील बहुतांश भागात साफसफाई होत नसून ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसारासह साथीचे आजार बळविण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावसाळ्यात साथीच्या आजरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून साफसफाईची मोहीम राबविली जात आहे.

यामध्ये उद्या दि. 1 ऑगस्ट रोजी मनपाच्या संपुर्ण इमारतीची साफसफाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राऊत यांनी बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.

सफाईचा अहवाल घेणार

साथीच्या आजार रोखण्यासाठी स्वच्छता संकल्प देश या योजनेतंर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दररोज शहरात स्वच्छता करणे गरजेचे आहे. तसेच शहरात डेंग्यू, मलेरिया यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात फवारणीवर लक्ष केंद्रीत करावे.

तसेच त्याचा दैनंदिन अहवाल सादर करणे अनिवार्य राहणार असल्याची सक्त ताकीद जिल्हाधिकारी राऊत यांनी अधिकार्‍यांना दिली.

आजपासून स्वच्छता मोहीम

स्वच्छता संकल्पना देश या योजनेतंर्गत 1 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपासून गंदगी से आजादी या उपक्रमाला महापालिकेतून सुरुवात होणार आहे. यामध्ये महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या उपस्थितीत श्रमदानाला सुरुवात होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या