Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedसामूहिक ते वैयक्तिक

सामूहिक ते वैयक्तिक

: आरजे सोहम

सध्या तरी थिएटरची जागा ज्याच्या त्याच्या हातातील छोटुश्या पडद्याने घेतली आहे. आता मनोरंजन वैयक्तिक पातळीवर सुरु झाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने तरुणाईला सगळ्याच प्रकारचा फ्रिडम दिला आहे. प्रेक्षकांनी तो स्वीकारला आहे.

- Advertisement -

पण ऑडिओ किंवा लाईव्ह कॉन्सर्ट हा एकमेव फॉर्म तसाच राहील असे मला वाटते. नाशिककडे चित्रपटसृष्टीचे लक्ष गेले आहे. एकदा का शूटिंगचा सिलसिला सुरु झाला की तो बदल मात्र कायमस्वरूपी होईल असे वाटते.

करोना आणि लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्राला देखील खूप मोठा फटका बसला. मनोरंजन सृष्टी अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. याही क्षेत्राला अपरिहार्य वळण मिळाले आहे. काय आहे ते वळण?

आधी लोक एकत्र सिनेमा बघायचे. मैफिली ऐकायला जायचे. नाटके बघायचे. काही काळापूर्वी लोक थिएटरला जाऊन सिनेमा बघत होते. सध्या थिएटर बंद आहेत. पण रसिकांचे फारसे काही अडले आहे असे वाटत नाही. कारण सध्या तरी थिएटरची जागा ज्याच्या त्याच्या हातातील छोटुश्या पडद्याने घेतली आहे.

आता मनोरंजन वैयक्तिक पातळीवर सुरु झाले आहे. ते प्रत्येकाच्या हातातील मोबाईलवर सामावले आहे. म्हणजे एकाच घरातील प्रत्येक सदस्य त्याला जे हवे ते आपल्या मोबाईलवर बघत असतो. इतक्या छोट्या पडद्यावर सगळ्यांनी एकत्र बसून बघणे शक्यही नाही.

ज्याची त्याची स्पेस जपली जाते असल्याने खरं तर आपापली एकेकटी करमणूक सगळ्यांना आवडायलाही लागली आहे. मालिकांमध्येही तसे बदल होत आहेत. सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या लोकप्रिय असणार्‍या मालिकांचा वेध घेतला तर हा बदल लक्षात येईल.

यातील अनेक मालिका किती जण एकत्र बसून बघतील? बघू शकतील? अनेक बिग बजेट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. आणि रसिकांनी पाहिले सुद्धा. म्हणजे त्यांनीही हा बदल तूर्तास तरी स्वीकारला आहे.

युवा पिढीचा आणि टीव्हीचा कनेक्ट जवळपास संपलाच आहे. युवा पिढीपैकी किती जण टीव्हीवरील कार्यक्रम पाहतात? कारण टीव्हीवर जे दाखवले जाईल तेच तरुणाईला पाहावे लागत होते किंवा आहे. त्यांना दुसरा चॉईस होता का? इंटरनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मने ही गॅप भरून काढली. इथे काय पाहायचे याचा चॉईस आहे. सार्वजनिक

रित्या किंवा सर्वानी एकत्र बसून करमणूक करणारे काही बघायचे म्हंटले तर काही नियम आणि बंधने येतात. ऑनलाईन करमणुकीने तरुणाईला तो फ्रीडम दिला. तो फ्रिडम का मिळाला? तर करमणूक वैयक्तिक पातळीवर सुरु झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरुणाईमध्ये सध्या कोणत्या सिरीयल लोकप्रिय आहेत याचा आढावा घेतला तर सगळ्यांच्याच हे लक्षात येईल. या माध्यमाने तरुणाईला क्रीएटिव्ह फ्रिडम दिला.

अर्थात एक छोटासा बदल याही माध्यमात सुरु होत आहे. सगळा परिवार एकत्र बसून बघेल अशा काही मालिका इथेही सुरू होत आहेत. पण त्यांचे प्रमाण हाताची पाच बोटे मोजावीत इतकेही नाही. एखादीच मालिका तरुणाई सर्वांबरोबर बघेल.

पण तरुणाईची पसंती वैयक्तिक करमणुकीलाच आहे हे या प्लॅटफॉर्मला चांगलेच माहिती आहे. शिवाय वैयक्तिक करमणुकीला प्राधान्य मिळणे त्यांच्याही फायद्याचे आहे. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रत्येकाला वेगवेगळी मेम्बरशिप घ्यावी लागते.

अर्थात प्रत्येक बदलाच्या दोन बाजू असतात. तशा याही बदलाच्या असतील. ज्या काही काळाने समोर येतील. त्यावर मंथन होईल. त्यातुन हा बदल कायमस्वरूपी राहील की काही गोष्टी पूर्वपदावर येतील ते समोर येईल. पण आगामी काही काळ तरी हे असेच सुरु राहील असे वाटते.

संगीत क्षेत्रही बदलते आहे. ऑनलाईन कॉन्सर्ट सुरु झाल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या मैफिली सुरु झाल्या आहेत. नाटके होत आहेत. ऑनलाईनचे तंत्र अनेक कलाकारांनी शिकून घेतले आहे. कलाकार टेकनोसॅव्ही होत आहेत. काही कलाकार माझे मित्र आहेत. त्यांचाही ऑनलाईन परफॉर्मन्स सुरु आहे.

पण खरे सांगू का? या गोष्टीपुरता हा बदल तात्पुरता राहील असे माझे मत आहे. रसिक शेकडो, हजारो रुपयांचे तिकीट काढून एखाद्या कॉन्सर्टला का जातात? मैफिली ऐकायला का जातात? लोकप्रिय नाटके बघायला गर्दी का करतात? कारण आपण एकटे बसून काही बघणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे यात फरक आहे.

रसिक वातावरणही जातात. त्यांना आपल्या आवडत्या गायकाला, नटाला, कलाकाराला प्रत्यक्ष समोरासमोर बसून ऐकायचे, बघायचे असते. अनुभवयाचे असते. त्यासाठीच तो तिकीट काढून जात असतो. त्यामुळे ऑडिओ किंवा लाईव्ह कॉन्सर्ट हा एकमेक फॉर्म तसाच राहील असे मला वाटत आहे.

नाशिककडे चित्रपटसृष्टीचे लक्ष गेले आहे. शूटिंगचा विचार केला तर मुंबई महागडे शहर झाले आहे. पुण्यात गर्दीच जास्त आहे. त्या तुलनेत नाशिकची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. पुणे आणि मुंबईमधून तुम्ही नाशिकला एका दिवसात ये-जा करू शकता.

आपले शहर तुलनेने स्वस्त आहे. आपल्या शहरात स्मार्ट आणि स्किलबेस्ड लेबर उपलब्ध आहे. शहरात टॅलेंट आहे. टीव्हीवरील अनेक गाजणार्‍या मालिकांमध्ये नाशिकचे कलाकार लीड रोल करत आहेत. हे लक्षात घेता, एकदा का शूटिंगचा सिलसिला सुरु झाला तर तो बदल कायमचा होईल असे वाटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या