Friday, April 26, 2024
Homeनगरसर्दी, खोकला, तापावर घरच्या घरीच उपचार सुरू

सर्दी, खोकला, तापावर घरच्या घरीच उपचार सुरू

राहाता |वार्ताहर| Rahata

करोना संसर्गाबाबत दूर झालेली भीती, त्याबाबत वाढलेला आत्मविश्वास तसेच लसीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये झालेली जागरुकता यामुळे सर्दी, खोकला झालेले रुग्ण घरीच उपचार घेऊन ठणठणीत बरे होताना दिसत आहे. परिणामी कोविड रुग्ण येण्याची प्रतीक्षा करीत असलेले अनेक हॉस्पिटलच्या खाटा मोकळ्या पडल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशात करोना आजाराने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत करोना झालेल्या व्यक्तीला व त्या घरातील सर्व व्यक्तींना विलगीकरण कक्षात मुक्काम ठोकावा लागायचा.

करोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूदर कमी होता व रिकव्हरी रेट जादा असल्याने करोनावर अनेक रुग्णांनी मात केली. परंतु दुसर्‍या लाटेत संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांना या विषाणूची बाधा झाल्याने अनेकांना ऑक्सीजन बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासू लागली. ऑक्सीजन बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले.

दुसर्‍या लाटेत करोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने यावर प्रतिबंधक उपाय म्हणून कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड ही लस उपलब्ध करण्यात आली. प्रथम वयोवृद्ध नागरिक व फ्रन्टलाइन वर्कर्स यांना लस प्राधान्याने देण्यात आली. नंतर 45 वयोगटापुढील त्यानंतर 18 व 45 वयोगटापुढील नागरिकांना लस देण्याकरिता आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या. परंतु केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून करोना संसर्गापासून प्रत्येकाचा बचाव करण्यासाठी मोहीम गतिमान केली.

राहाता तालुक्यात आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करून जवळपास 90 टक्के लसीकरण करून घेण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे नागरिकांच्या प्रतिकार शक्तीत वाढ झाली व ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवला नाही.

दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्या लस लाभार्थ्यांना बुस्टर डोस हा पर्याय उपलब्ध झाल्याने तिसर्‍या लाटेत ओमिक्रॉन विषाणूचा प्रभाव फारसा दिसला नाही. येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोका निर्माण करणारी असू शकेल, असे अंदाज अनेक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविले होते. परंतु देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत झालेली जागरुकता करोना संसर्गा बाबत दूर झालेली भीती, वाढलेला आत्मविश्वास यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला झालेले रुग्ण घरीच उपचार घेऊन ठणठणीत बरे होत आहे. परिणामी करोना रुग्णांची प्रतीक्षा करीत बसलेले हॉस्पिटलच्या खाटा ओस पडल्या आहेत. असे असले तरी नागरिकांनी गाफील न राहता गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून करोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या