लाचखोरांची न घाबरता तक्रार करा

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नागरिक तक्रार करायला घाबरतात, म्हणून याबाबत सामान्य नागरिकांमध्ये आणखी जनजागृती होण्याची गरज आहे. ज्या व्यक्तीचे काम भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे होत नसेल त्यांनी न घाबरता आमच्याकडे तक्रार करावी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ‘त्या’ कामाची हमीही घेतो, तसेच तक्रारदाराचे नाव ही गुपित ठेवतो. यामुळे नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्ट अधिकारी, सेवकांच्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले आहे.

दैनिक देशदूतच्या ‘कॉफी विथ एडिटर’ या विशेष उपक्रमामध्ये त्यांच्याशी ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.पोलीस युनिफॉर्मची मला लहानपणापासून आवड होती. त्यामुळे मी पोलीस दलात सामील झाले. तसेच लहानपणी किरण बेदी यांचाही आदर्श माझ्यासमोर होता. सोलापूरला सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेला असताना निर्भया पथक ही संकल्पना अमलात आणली. निर्भया पथकातील महिलांना प्रशिक्षण दिले. तसेच त्यांचा गणवेश व इतर बाबींमध्ये लक्ष घालून त्यांना नवी ओळख दिली. तो पॅटर्न सध्या राज्यभर चांगला काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदगाव स्थानकात बस जळून खाक

लाचलुचपत विभाग हा राज्य शासन ज्यांना पगार देतो त्यांच्यावर कारवाईसाठी सक्षम आहे. तर काही ठिकाणी इमर्जन्सी असल्यावर आम्हाला त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून लाचखोराला जेरबंद केलेे जाते, मात्र नंतर ते प्रकरण संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजात तसेच इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात येणार आहे. या विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नागरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीने राज्यभरातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सूचना मागितल्या आहेत. त्यानुसार आपणही काही सुचना या समितीकडे दिल्या आहेत. त्याचा अहवाल शासनाकडे गेल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधिक चांगले बदल दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नाशिक विभागात 130 लाचखोर जाळ्यात

भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्या गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल सुमारे 130 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

वालावलकर यांच्याविषयी

मूळच्या सांगली जिल्ह्यातील शर्मिष्ठा वालावलकर यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर, अहमदनगर आदी ठिकाणी त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *