कोचिंग क्लास का वाढतात, याचे आत्मपरीक्षण करा

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासला जातात, हे शिक्षक व मुख्याध्यापकांचे अपयश आहे. पालक कर्ज काढून मुलांना कोचिंग क्लासला पाठवतात, हे दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी दिला. सीईटी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. मात्र, या परीक्षेच्या तयारीत नववीपासूनच पालक व विद्यार्थी थकून जातात. त्यामुळे मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी सीईटी पुनर्विचारावर विचारमंथन करावे, या परीक्षचे फायदे-तोटे तपासावेत व शासनाला शिफारशी कराव्यात, असे आवाहनही मंत्री विखेंनी केले.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 61 व्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन येथील सहकार सभागृहात मंत्री विखेंच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, आ. जयंत आसगावकर, महामंडळाचे राज्याध्यक्ष जे. के. पाटील, नगरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिवाजी काकडे, मयुरा गणपुले, प्रा. भानुदास बेरड, अप्पा शिंदे आदी उपस्थित होते. ना. विखे म्हणाले, 35 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे शैक्षणिक धोरण आणले आहे, यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत.

त्यामुळे यात आपण कोठे आहोत, याचा विचार शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावा, असे आवाहन केले. तसेच आपण फक्त मुलांची गळती व शाळा बाह्य मुले यावरच चर्चा करतो. पण कोविड काळाने सर्वांना स्वीकारण्यास भाग पाडलेल्या ऑनलाईन व डिजीटल शिक्षण प्रणालीतही शिकवण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला नाही, जुन्या पद्धतीनेच मुलांना आताही शिकवले जाते. पण सोशल मीडियाने मुलांपर्यंत अनेक माहिती पोहोचते, त्यामुळे माहितीची साधने शिक्षक वा राज्यकर्त्यांपर्यंत सीमित राहिलेली नाही.परदेशातही ऑडिओ-व्हीडीओ टेक्नॉलॉजीचा शिक्षणात वापर करतात.

पण आपल्याकडे अजूनही दुर्लक्ष केले जाते. शाळेत हजेरी घेतात, म्हणून मुले येतात. पण महाविद्यालयात मुले कोठे असतात? निम्मी महाविद्यालये कोचिंग क्लासवालेच चालवतात. संस्थाचालक व शिक्षकांना यात 30 टक्के मिळतात. शाळा-महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना येथे दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे आपले अपयश आहे. कोचिंगक्लासच्या धंद्यामुळे शाळांच्या शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेत फार मोठा अडसर निर्माण झाला आहे. जे पालक महाविद्यालयाचे दोन हजार रुपये भरण्यास नाखूष असतात, तेच पालक कोचिंग क्लासचे 50 हजार भरतात, याचे आत्मपरीक्षण शिक्षक व मुख्याध्यापक कधी करणार?, असा सवालही विखेंनी केला.

पूर्वी महाराष्ट्रात एकच लातूर पॅटर्न होता, तोही आता बंद झाला आहे व सारे राजस्थानातील कोटाला जात आहे, त्यामुळे कोचिंगक्लासचे पेव का फुटले, याचा विचार शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच करायला हवा, असे आवाहन विखेंनी केले. प्राचार्य सुनील पंडीत यांनी स्वागत केले. महामंडळाचे राज्याध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. कर्डिले यांचेही भाषण झाले. वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. आभार राज्य सचिव शांताराम पोखरकर यांनी मानले. प्रारंभी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अधिवेशनाच्या ज्ञानकलश स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

प्रश्न सोडवावे लागतीलच

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहेच, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, शिक्षकांचे अधिकाराचे जे आहे, ते त्यांना दिलेच पाहिजे, 100 टक्के अनुदान तत्वही स्वीकारावेच लागेल. पण राज्यकारभारात प्राथमिकता महत्त्वाची असते. कोविड संकट व अतिवृष्टी अशा कारणांमुळे प्राधान्यक्रम बदलावे लागतात. मात्र, जुनी पेन्शन व अनुदान वाढ याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न निकाली काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *