Friday, April 26, 2024
Homeनगरढगफुटी सदृश पावसाने अस्तगावच्या ओढ्याला पूर

ढगफुटी सदृश पावसाने अस्तगावच्या ओढ्याला पूर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील गोगलगाव, मापारवाडी भागात ढग फुटी सदृश पावसाने ओढ्याला पूर आला त्यामुळे याचा फटका अस्तगाव भागातील तीन तीन बंधार्‍यांना बसला. पुराने तीन बंधारे फुटले, सातमोर्‍या निम्म्या पाण्यात गेल्या, मुस्लिम कब्रस्थानही पाण्याखाली गेले.

- Advertisement -

मंगळवारी राहाता तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. इतर गावांच्या तुलनेत गोगलगाव, मापरवाडी आदी भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. अस्तगाव भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आगोदरच बंधारे तुडूंब असताना गोगलगाव, मापारवाडी, काही आडगाव भागातील पाणी गावाच्या पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहणार्‍या ओढ्याला पूर आला. सुरुवातीला आरंगळे वस्ती भागातील मातीचा बंधारा फुटला. हा बंधारा फुटल्यानंतर माळीनगर भागातील आरंगळे वस्ती शाळेजवळील दुसरा बंधारा फुटला.

त्यानंतर खाली गणेश साखळी बंधार्‍यातील सापते वस्तीजवळ एक बंधार्‍याचा भराव रस्त्यासह तुटल्याने खाली मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. याचा परिणाम अस्तगाव येथील मुस्लिम कब्रस्थान पाण्याखाली गेले. अस्तगाव पाणी योजनेच्या क्रमांक 1 च्या साठवण तलावातून पुराचे पाणी वाहू लागले. खाली हे पाणी गोदावरी कालव्याला असलेल्या सात मोर्‍या निम्म्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे पूर्वभागातील रहिवाश्यांचा गावाशी संपर्क तुटला. या ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. मोठ्या प्रमाणात पाणी एकरुखे गावाच्या दिशेने वाहत होते.

अस्तगाव भागातील तीन मातीचे बंधारे फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय भाऊराव सापते यांनी 35 हजार रुपये खर्च करून साखळी बंधार्‍याच्या भागात रहिवाश्यांसाठी रस्ता केला होता. तोही वाहून गेला. आता त्या भागातील रहिवाश्यांना इतरत्र जावे लागणार आहे. यामुळे सोयाबीन, मका, यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. काल कृषी विभागाचे वांढेकर, तलाठी पदमा वाडेकर, ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब मगर आदींनी पाहणी केली.

सरपंच नवनाथ नळे यांनी दक्षता घेत स्वत:चा जेसीबी देत अडथळे दूर केले. जेजूरकर वस्ती भागातील झाडे काढली. ही झाडे वीज वितरण कंपनीच्या खांबावर पडण्याची चिन्हे होती. माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, सदस्य पवन आरंगळे, सदस्य सुरेश जेजुरकर, गोरख जेजुरकर, किसन जेजुरकर, ज्ञानेश्वर जेजुरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव लोंढे, उपाध्यक्ष रविंद्र जेजुरकर, संजय आत्रे, सुभाष आरंगळे, किसन जेजुरकर, निवास त्रिभुवन, संतोष गोर्डे, वाल्मिकराव गोर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

आडगावला धुव्वाधार!

दरम्यान आडगाव भागातील बंधाराही या पावसाने सलग तिसर्‍या वर्षी भरला आहे. यामुळे जिरायती टापूतील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. काही महिने या बंधार्‍याच्या लाभक्षेत्रातील विहिरींना याचा फायदा होतो.

दहेगावला पिकांचे नुकसान

तालुक्यातील दहेगाव येथे सोयाबीन, मका यासारखी पिके जोरदार पावसाने पाणी साठल्याने पाण्यात बुडाली आहेत. यामुळे शेतकर्‍यांनी राहाता तहसीलदार यांच्याकडे पंचनामे करण्याच्या मागणी केली आहे.

काल सायंकाळी 5 वाजेनंतर पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस अर्धातास सुरू होता. जोमाने वाढलेल्या पिकांमध्ये पाणी साठलेले आहे. आता पुन्हा पुन्हा पाऊस होत असल्याने या पिकांचे कसे होणार? असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे! काही ठिकाणी चारा पिके तसेच सोयाबीन सारखे नगदी पीक पाण्यात आहे. पाणी जिरणे थांबल्याने पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या