अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर चढाईसाठी गिर्यारोहक अनिल वसावे रवाना

jalgaon-digital
3 Min Read

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागाच्या (Department of Tribal Development) मिशन शौर्य अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्प (Mount Everest Base Camp) व दक्षिण अमेरिकेतील (South America) माउंट एकांकगुआ (Mount Ekankagua) या शिखरावर चढाईसाठी जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक (International mountaineer) अनिल मानसिंग वसावे (Anil Mansingh Vasave) याला आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विकास मंत्री (Tribal Development Minister) अ‍ॅड. के.सी. पाडवी (Adv. K.C. Padvi) यांच्या हस्ते शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.

आदिवासी समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच क्रीडा धोरण ठरविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून हॉकी खेळाडू व माजी सनदी अधिकारी स्व. जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. पाडवी यांनी यावेळी दिली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त महेंद्र वारभुवन आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील अनिल वसावे हा तरुण 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 22 या दरम्यान एव्हरेस्ट बेस कँपवर जाणार आहे. त्यानंतर दि. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2022 या कालावधीत दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच माऊंट एकांकगुआ हे शिखर सर करण्यासाठी जाणार आहे.

या दोन्ही उपक्रमासाठी अनिल वसावे याला मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. यावेळी श्री. पाडवी म्हणाले की, सातपुडा पर्वतरांगेत राहणारा आदिवासी समाज हा काटक असून गिर्यारोहणात अग्रेसर असतात. अनिल वसावे हा तरुणही जगातील सात खंडातील सर्वात उंच शिखरे सर करून महाराष्ट्राचे व देशाचे नाव लौकिक जगात मिळवेल. त्याच्या या ध्येयाला आदिवासी विभागाने पाठबळ द्यायचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागाच्या धोरणात लवकरच काही बदल करण्यात येणार आहेत.

त्यामध्ये अशा खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण ठरविण्यात येणार असून आदिवासी युवक आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पुढे कसे जातील यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडूंना आदिवासी समाजातील हॉकीपटू व घटना समितीच्या उपसमितीचे सदस्य जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गिर्यारोहक श्री. वसावे यांनी आदिवासी विकास विभागाच्या मदतीबद्दल आभार मानून गिर्यारोहणाच्या माध्यमातून देशाचे व राज्याचे नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभूवन यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त प्रदीप देसाई यांनी स्वागत केले. प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *