गटबाजीमुळेच नगर शहर शिवसेना कोमात

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर बालेकिल्ला असतानाही पक्ष लयास चाललाय. शिवसेनेतंर्गत गटबाजीमुळेच महापालिकेतील सत्ता गेली.

कोणालाच पक्षाचे गांभीर्य राहिलेले नाही. सगळेच अपेक्षा ठेवून काम करत आहेत.

अगोदर कर्तव्य पार पाडयाला शिका. गटबाजी विसरून एकत्र या तरच शहरात पुन्हा भगवा फडकवेल अन्यथा शिवसेना नामशेष होण्याच वेळ लागणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी शिवसेनेतंर्गत गटबाजीवर भाष्य केले आहे.

दिल्लीगेट येथे काल रविवारी पंधाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्व. अनिल भैय्या राठोड यांच्या बरोबरीने पंधाडे यांनी शिवसेना नगर शहरात रुजविली, वाढविली. आज त्याच शिवसेनेला गटबाजीने ग्रासले आहे. त्याची खंत व्यक्त करताना पंधाडे यांनी गटबाजी करणार्‍यांची चांगलीच कान उघडणी केली.

शिवसेनेतंर्गत दोन्ही गटाकडून एकमेकांची उणीधुणी काढण्याचे प्रकार सुरू आहे. कोणाला नगरसेवक तर कोणाला महापौर व्हायचे आहे. प्रत्येकाला अपेक्षा आहेत, पण अगोदर कर्तव्य पार पडायला शिका असा सल्ला पंधाडे यांनी दिला. पहिल्यासारखी शिवसेना आता राहिलेली दिसत नाही. गटबाजीने पोखरली गेली आहे. शिवसेना पक्ष मोठा असला तरी तो आता गटातटात विभागला गेला आहे.

मोहरक्या सोडून गेल्यामुळे आता विलगीकरण झाले आहे. त्यातच आता गटबाजी उफाळून आली आहे. अपेक्षा सगळ्यांना असतात. अपेक्षा ठेवून सगळे काम करत आहे. अपेक्षा करताना आपले काही कर्तव्य आहे, याचाही विचार झाला पाहिजे. अपेक्षा ठेवतांना कर्तव्य देखील बजावायला शिका अशी भूमिका पंधाडे यांनी माध्यमांसमोर मांडली. महापालिकेत गटबाजीमुळे शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही.

नगर शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. गटबाजी असतानाही विधानसभा निवडणुकीत राठोड यांना 70 हजार मते मिळाली होती. हीच खरी ताकद आहे. पक्षाचे गांभीर्य आता कोणाला राहिले नाही. असेच सुरू राहिले तर थोड्याच दिवसात पक्ष नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिक एकत्र आले तरच पक्ष वाढेल स्व. बाळासाहेबांचा जुना शिवसैनिक म्हणून दोन्ही गटांतील नगरसेवक व पदाधिकार्‍यांशी चर्चा करू असेही पंधाडे यांनी सांगितले.

नावापुरतेच…

शिवसेनेच मंत्री शंकरराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पंधाडे यांना विचारला असता ते म्हणाले, मंत्री गडाख यांनी मध्यस्थी करण्याची गरज काय ? तुम्ही सर्वजण एक झाले असते, एकीने काम केले असते, तर ही आत्ताची वेळ आली नसती. गडाख यांना सगळ्यांनी साथ देणे आवश्यक होते. पण नावापुरते तेथे गेले, पुन्हा दोन बाजूला दोन तोंडे, तीन बाजूला तीन तोंडे असा प्रकार पुन्हा सुरू झाला असून या सर्व परिस्थितीला सर्वानी गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्व. अनिल राठोड व मी तसेच आमच्यासोबतच्या शिवसैनिकांनी लाठ्या-काठ्या खाऊन नगर शहरात शिवसेना वाढविली. शिवसेना टिकवयाची असेल तर गटबाजी विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. तीच खरी अनिल राठोड यांना श्रध्दांजली ठरेल. शिवसेनेची शहरात होत असलेली वाताहत पाहताना वाईट वाटते. भांडण, वाद विसरून एकत्र या.. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास जायला वेळ लागणार नाही.

– अंबादास पंधाडे, ज्येष्ठ शिवसैनिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *