Saturday, April 27, 2024
Homeनाशिककार्यक्रमासाठी लागणार पोलीस परवानगी अन्यथा..!

कार्यक्रमासाठी लागणार पोलीस परवानगी अन्यथा..!

नाशिक । Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेली गर्दी व विनापरवानगी आयोजीत जाणारे कार्यक्रम यामुळे करोनाची भिती वाढत असून गर्दी होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाची पोलिसांकडे नोंद होणे आवश्यक होणार आहे. यासाठी पोलिस आदेश लागू करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

करोना लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा सर्वत्र गर्दी वाढली आहे. सर्वच ठिकाणी करोना नियमांना तिलाजंली देण्याचे काम होत आहे. नियमांचे पालन झाले नाही तर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कंबर कसली असून, किमान गर्दी होणार्‍या कार्यक्रमांची नोंद होणे आवश्यक असल्याचे निश्चित केले आहे. विवाह, छोटेखानी समारंभ, छोटे मोठे आंदोलने, धार्मिक वा सांस्कृतीक कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी गर्दी होते. मात्र, त्याची नोंदच नसते.

त्यामुळे कार्यक्रमास किती गर्दी झाली हे स्पष्ट होत नाही. सोसायटीत वाढदिवस होतात. हळदीच्या कार्यक्रमांवेळी साउंड सिस्टिमचा सर्रास वापर होतो. या कार्यक्रमांसाठी नियमावली ठरविण्याची आवश्यकता आहे. यासाठी आदेश लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी नागरीकांच्या सुचनांसाठी 1 महिना कालावधी देण्यात येणार आहे.

यानंतर नागरिकांच्या येणार्‍या सुचना व हरकतींचा विचार करून पुढे मुंबई पोलीस अधिनियम 33 प्रमाणे कारवाई करण्याच्या नयमावलीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ही नियमावली करोना काळापुरतीच मर्यादीत नसून, भविष्यातही ती कायम राहणार आहे.

एकदा की नियमावली लागू झाली की घराबाहेर, सोसायटीच्या व इतर रस्त्यावर होणार्‍या कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक राहणार आहे. ही परवानगी देण्याची प्रक्रिया सहज सुलभ राहणार असून, आयोजकांना फक्त पोलिसांनी दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करावे लागणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या