Tuesday, May 14, 2024
Homeनगर...तर गणेश मूर्ती कारखानदारांवर गुन्हे

…तर गणेश मूर्ती कारखानदारांवर गुन्हे

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून मूर्ती कारखान्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शासन नियमानुसार घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट तर, सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट असावी अन्यथा आपल्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नोटीसीद्वारे मूर्ती कारखान्यांच्या मालकाला कळविण्यात आले आहे. शहर पोलिसांनी या नोटीसा दिल्या आहेत.

करोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्य पद्धतीने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. गणेशोत्सव बाबत मार्गदर्शन सुचना जारी केल्या आहेत. अहमदनगर शहरामध्ये मानाच्या गणेश मंडळासह अनेक सार्वजनिक मंडळाकडून गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहरातील गणेश मंडळ प्रमुखांची बैठक घेतली.

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. मिरवणुका न काढता, मंडप न घालता घरच्या घरीच बाप्पांची मूर्ती स्थापन करण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या. गणेश मूर्ती तयार करताना भक्तांच्या मागणीनुसार मोठ्या व आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या जातात. यंदा मात्र सरकारने सार्वजनिक गणेश मूर्ती चार फूट व घरगुती गणेश मूर्ती दोन फूट असावी असे स्पष्ट केले आहे.

याची अंमलबजावणी केली जावी यासाठी शहर पोलिसांनी मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याच्या मालकांना सीआरपीसी कलम 149 अन्वये नोटीस दिल्या आहेत. घरगुती गणपती स्थापनेकरीता गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना दोन फूटापेक्षा जास्त उंची असलेली मूर्ती विक्री करू नये.

तसेच, सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना चार फूटापेक्षा जास्त उंची असलेली गणेशाची मूर्ती विक्री करू नये असे शहर पोलिसांनी सर्व मूर्ती कारखानदारांना कळविले आहे. एखाद्या सार्वजनिक गणेश मंडळाकडे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची उंची चार फूटापेक्षा जास्त आढळून आल्यास व सदरची मूर्ती ज्या कारखान्यात तयार करून विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असेही कळविण्यात आले आहे. यामुळे यंदा मूर्ती तयार करताना चार फूटापेक्षा कमी उंची असलेली मूर्ती तयार करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या