Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशसुधारित नागरिकत्व कायदा लवकरच होणार लागू

सुधारित नागरिकत्व कायदा लवकरच होणार लागू

नवी दिल्ली –

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लवकरच देशभरात लागू होणार आहे. करोना संकटामुळे याच्या अंमलबजावणीला उशीर झाला, अशी माहिती

- Advertisement -

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्याची सध्या चर्चा आहे.

नड्डा म्हणाले, कोविड-19 महामारीमुळं सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला उशीर झाला. पण आता ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. सर्वत्र कामंही सुरु झाली आहेत आणि जनजीवनही पूर्वपदावर येण्यासाठी नियमावली तयार झाली आहे. त्यामुळे या कायद्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. हा कायदा संसदेत मंजूर झाला आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला सर्वांना या कायद्याचे फायदे मिळणार आहेत असं सिलिगुडी येथील लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना नड्डा यांनी म्हटलं.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत हिवाळी अधिवेशनादरम्यान सुधारित नागरिकत्व कायद्याला संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली होती. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर या कायद्याविरोधात निदर्शने झाली. ही निदर्शने सुरु असतानाच देशात करोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्याने लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. अद्यापही टप्प्याटप्प्याने तो संपवला जात आहे.

या नव्या नागरिकत्व कायद्यात जे हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मीय लोक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून सन 2015 पूर्वी भारतात आले आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यातील अटी शिथील करण्यात आल्या आहेत. मात्र, यातून मुस्लिमांना वगळण्यात आल्याने याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या